नीलेश लंकेंकडून करेक्ट कार्यक्रम! विखे पाटील -थोरात यांच्या सहमती एक्स्प्रेसला मोठा झटका; अहिल्यानगर जिल्हा बँकेत जोरदार एन्ट्री, ६४ मतं घेत मिळवला मोठा विजय
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. सेवा सोसायटी मतदारसंघातून त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक राहुल शिंदे यांचा २४ मतांनी पराभव केला. या निकालामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सेवा सोसायटी मतदारसंघातील मतमोजणीत नीलेश लंके यांना ६४ मते मिळाली, तर राहुल शिंदे यांना ४० मते प्राप्त झाली. त्यामुळे लंके यांनी स्पष्ट आघाडी घेत संचालकपदावर विजय मिळवला. या निवडणुकीत सहकार परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून लंके यांनी प्रभावी कामगिरी केल्याचे मानले जात आहे.
विखे पाटील–थोरात यांच्या राजकीय प्रभावाला आव्हान?
अहिल्यानगर जिल्ह्यात सहकार क्षेत्रावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव महत्त्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीत नीलेश लंके यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळवलेला विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे. त्यांच्या यशामुळे सहकार क्षेत्रातील विरोधी राजकीय गटांना नव्याने बळ मिळाल्याचे चित्र आहे.
