कृषी विभागाची भरारी; केंद्राकडून शाब्बासकी
पीएमएफएमई योजनेत बेळगावची राज्यात बाजी : केंद्र सरकारकडून गौरव : 1,279 लघुउद्योजकांना 97.14 कोटींचे कर्ज;
प्रतिनिधी/ बेळगाव
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत बेळगाव जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. योजनेला 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे पीएमएफएमई परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या राज्ये व जिल्ह्यांचा गौरव करण्यात आला. या परिषदेत बेळगावच्या कामगिरीबद्दल कृषी विभागाचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांचा केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पीएमएफएमई योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लघु अन्न प्रक्रिया उद्योजकांना मोठ्या प्रमाणात कर्ज व अनुदान उपलब्ध करून देण्यात आल्याने केंद्र सरकारने बेळगावच्या कामगिरीची दखल घेतली आहे. पीएमएफएमई योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1,279 लघुउद्योजकांना 97.14 कोटी ऊपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यापैकी 36.61 कोटी ऊपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या आर्थिक मदतीमुळे स्थानिक पातळीवरील अन्न प्रक्रिया उद्योगांना उभारी मिळत असून छोट्या उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यास व उद्योगाचा विस्तार करण्यास मदत होत आहे.
शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्याबरोबरच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यास या योजनेमुळे हातभार लागत आहे. परिणामी ग्रामीण भागातील उद्योजकता व रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे, तसेच विविध बँकांच्या सहकार्यामुळे योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करता आली. कृषी विभागाने पात्र लघुउद्योजकांचा शोध घेऊन त्यांना योजनेची माहिती देण्यासोबतच कर्ज व अनुदान प्रक्रियेत आवश्यक सहकार्य केले.
अधिकाधिक उद्योजकांना योजनेच्या कक्षेत आणण्यासाठी कृषी विभाग, बँका आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम केले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीत बेळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली. केंद्र सरकारच्या स्तरावर झालेला हा सन्मान जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कामगिरीला मिळालेली महत्त्वपूर्ण पोहोच पावती मानली जात आहे. पुढील काळातही अन्न प्रक्रिया क्षेत्रातील अधिकाधिक लघुउद्योजकांना पीएमएफएमई योजनेचा लाभ मिळवून देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.