Kolhapur News | जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र चालकांचा दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद
महाराष्ट्रात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत संप;
शाहूवाडी - कृषी सेवा केंद्रासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून लावलेल्या जाचकअटी रद्द कराव्यात . प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवाव्यात , यासह विविध मागण्यासाठी महाराष्ट्रातील 85000 कृषी सेवा केंद्र चालकांनी सोमवार 27 एप्रिल पासून बेमुदत संप पुकारला आहे . संपाच्या दुसऱ्या दिवशी देखील जिल्ह्यातील दोन हजार कृषी सेवा केंद्राचे शटर बंदच होते .
या बंद मुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे . खरीप हंगामाच्या तोंडावरच कृषी सेवा केंद्राचा संप हा शेतकऱ्यांना चांगलाच त्रासदायक ठरू लागल्याने शेतकरी वर्गातून देखील चिंतेचे वातावरण पसरू लागल आहे .शासन गांभीर्याने याकडे पाहणार का याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे .
कृषी सेवा केंद्रासाठी नवीन नियमावली येत आहेत . मात्र यापूर्वीच्या देखील काही जाचक अटी या रद्द कराव्यात .यासाठी महाराष्ट्र फर्टीलायझर , पेस्टिसाइड ,सीड्स असोसिएशन यांच्या वतीने संपाची हाक दिली आहे .या संपाला देशातील विविध राज्यांतील कृषी सेवा संघटनांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे . यामुळे या संपाला अधिकच बळ मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी सेवा केंद्र चालक यांनी कडकडीत बंद पाळला या बंदला कोल्हापूर जिल्ह्यातून देखील उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला . जिल्ह्यातील दोन हजार कृषी सेवा केंद्र चालकांनी या संपात सहभाग घेतला . तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सर्वच संघटनांनी या संपाकडे विशेष लक्ष दिल्याने कुठेही संपाला गालबोट लागले नाही .