ब्राम्होस विक्रीसाठी व्हिएतनामशी करार
इंडोनेशियालाही स्वारस्य, लवकरच होणार स्वाक्षरी
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताची ब्राम्होस क्षेपणास्त्रे विकण्यासाठी भारताने व्हिएतनाम या देशाशी करार केला आहे. शनिवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. देशाच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली आहे. व्हिएतनाम पाठोपाठ इंडोनेशियानेही ही क्षेपणास्त्रे विकत घेण्यात स्वारस्य दाखविले असून त्या देशाशीही लवकरच करार करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. भारताने या क्षेपणास्त्रांची निर्मिती रशियाच्या साहाय्याने केली असून या क्षेपणास्त्रांनी ‘सिंदूर अभियाना’त निर्णायक कामगिरी केली होती. याच क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने भारताने त्या अभियानात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अ•s आणि पाकिस्तानची अनेक लष्करी अस्थापने नष्ट केली होती. तेव्हापासून या क्षेपणास्त्रांची जगात चर्चा होत आहे.
भारताच्या संरक्षण विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. तेथील एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे. व्हिएतनामशी झालेल्या कराराची वाच्यता करण्यात आली नव्हती. पण हा करार झाला आहे. तसेच इंडोनेशियाशीही करारासंबंधीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. ही क्षेपणास्त्रे अत्यंत प्रभावी असून ती रडार यंत्रणेलाही चकवा देऊ शकतात, हे ‘सिंदूर अभियाना’त दिसून आले होते. भारताने या क्षेपणास्त्रांच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालविले असून यांना प्रतिसाद मिळत आहे.
भारताची आशियाशी प्रतिबद्धता
दक्षिण आशिया आणि भारताच्या आसपासच्या आशियायी देशांसंबंधी भारत प्रतिबद्ध आहे. या देशांचे संरक्षण व्हावे, ही भारताची इच्छा आहे. भारत स्वत: संरक्षण यंत्रणेचे अत्याधुनिकीकरण करण्यावर भर देत आहे. तंत्रज्ञान विकास आणि संशोधनातून शस्त्रनिर्मितीत आत्मनिर्भर होण्याचा भारताचा प्रयत्न आहे. ब्राम्होस क्षेपणास्त्रांची निर्मिती हा याचाच परिपाक आहे. फिलिपाईन्स या देशाने भारताकडून प्रथम ब्राम्होस क्षेपणास्त्रांची खरेदी केली होती. त्यानंतर आता आणखी तीन-चार देशांनी या क्षेपणास्त्रांच्या खरेदीत स्वारस्य दाखविले आहे. शत्रूच्या प्रदेशातील लक्ष्यांवर वेगवान आणि अचूक मारा करुन ती नष्ट करण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता आहे. भारताने आणखी अनेक प्रकारांची क्षेपणास्त्रेही विकसीत केली आहेत.
पुरवठा साखळ्या बळकट करणार
शस्त्रपुरवठा साखळ्या बळकट करण्यासाठी भारत अन्य देशांशी सहकार्य करण्यास सज्ज आहे. सर्वसाधारणपणे कोणताही देश आपल्या सहकारी देशाला किंवा मित्रदेशाला संरक्षण सामग्रीची निर्यात करतो. भारताही या नियमाचे पालन करीत आहे. ज्या देशांवर आमचा विश्वास आहे, त्यांनाच आम्ही स्वदेशनिर्मित शस्त्रे विकत आहोत. जगाच्या सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक देशाने स्वत:च्या संरक्षणाची सिद्धता ठेवणे आवश्यक झालेले आहे. आम्ही स्वत:ची संरक्षणसिद्धता बळकट करण्याप्रमाणेच आमच्या मित्र देशांच्या संरक्षणासाठीही प्रयत्नशील आहोत, अशा अर्थाची विधाने राजेश कुमार सिंग यांनी सिंगापूरमधील कार्यक्रमात दिली.
संरक्षण निर्यातीत लक्षणीय वाढ
भारताच्या संरक्षणसामग्री निर्यातीत 20225-2026 या वर्षात मोठी वाढ होऊन ती 36 हजार कोटींवर पोहचली आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात या निर्यातीत आणखी वाढ होऊन ती 50 हजार कोटी रुपयांवर नेण्याची भारताची योजना आहे. भारताने अत्याधुनिक शस्त्रांच्या निर्मितीवरही मोठा भर दिलेला आहे.