शेतकऱ्यांचे हित राखून अमेरिकेसोबत करार
संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून पियुष गोयल यांचे भाषण
► नवी दिल्ली
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करार हा शेतकऱ्यांचे हित राखून करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी दोन्ही सदनांमध्ये संयुक्तरित्या बोलताना दिली. कृषी आणि खताच्या संदर्भातल्या क्षेत्रामध्ये भारताचे हित पूर्णपणे राखण्यात आले असल्याचे ते म्हणाले. हा करार छोट्या आणि मध्यम उद्योजक, कुशल कामगार आणि उद्योगांसाठी महत्त्वाचा ठरणार असून अनेकविध संधी प्राप्त होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योगांमध्ये आवश्क ते बदल करणे येत्या काळात शक्य होणार आहे.
केंद्रीय मंत्री संसदेत बोलत असतानाच विरोधी पक्षांचा जोरदार विरोध सुरु होता. त्यांनी त्यांच्या घोषणांकडे दुर्लक्ष करत आपले बोलणे सुरुच ठेवले होते. मंत्री गोयल म्हणाले, सरकारने राष्ट्रीय हितांचे सर्वतोपरी रक्षण करतच अमेरिकेसोबत व्यापारासंदर्भात चर्चा केलेली आहे. गेल्यावर्षी दोन्ही देशांमध्ये विविध पातळीवर सविस्तरपणे व्यापाराशी संबंधीत चर्चा केलेली आहे. दोन्ही पक्षांचे हित राखूनच सदरचा करार अंतिम केला गेला असल्याचेही त्यांनी म्हटले. वर्षभरातील दोन्ही देशांच्या द्विपक्षीय सविस्तर चर्चेअंतीच हा करार यशस्वीपणे केला गेला आहे.
विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतासाठी हा करार महत्त्वाचा असून येत्या काळात उर्जा, विमान क्षेत्र, डाटा सेंटर, परमाणू ऊर्जा यासह महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये आपली क्षमता भारत वाढविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कराराअंतर्गत भारत फक्त आयातीवरच लक्ष केंद्रीत करणार नसून निर्यातीलाही चालना देण्यासाठी झटणार आहे. या कराराला लवकरच कागदोपत्री अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी म्हटले. करारात उर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा दोन्ही देशातील करार ऐतिहासिक असून दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत होणार आहेत.