हवामान कृतीसंबंधी केंद्र-राज्य यांच्यात करार
प्रतिनिधी/ पणजी
नगर शाश्वतता आणि हवामान लवचिकतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना स्मार्ट सिटीने जयपूर येथील राजस्थान इंटरनॅशनल सेंटर येथे शहरी गुंतवणूक 2.0 कार्यक्रमांतर्गत महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, गोवा नगरविकास खाते आणि राष्ट्रीय नागरी व्यवहार संस्था यांच्यात हवामान कृतीसंबंधी हा त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, नगर विकास संचालक ब्रिजेश मणेरकर आणि मनपा आयुक्त क्लेन मडेरा यांच्या उपस्थितीत ही स्वाक्षरी करण्यात आली. या कराराचा भाग म्हणून तिन्ही संस्था राज्य नेतृत्वाखालील हवामान कृती चालविण्यासाठी सहकार्य करणार आहेत.
दुसऱ्या करारांतर्गत राजधानी पणजी शहरात एकात्मिक कचरा व्यवस्थापन उपाय लागू करण्यासाठी मनपा, नगर विकास खाते आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट या तिन्ही संस्था एकत्र काम करणार आहेत.
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पांसाठी एक अंदाजे अनुदान वाटप करण्यात आले आहे, त्यानंतर कामगिरी-आधारित मूल्यांकनांनुसार अंतिम अनुदान मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.