देशाच्या संरक्षणासाठी अग्निवीर सज्ज
एअर व्हॉईस मार्शल पीसीपी आनंद : 1634 अग्निवीर देशसेवेत रुजू
बेळगाव : देशातील सर्वोत्तम वायू प्रशिक्षण अग्निवीरांना देण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यात ते कोठेही कमी पडणार नाहीत. देशाच्या संरक्षणासाठी येणारी आव्हाने स्वीकारण्यासाठी वायुवीरांनी सदैव सज्ज रहावे, असे प्रतिपादन एअर व्हॉईस मार्शल पीसीपी आनंद यांनी केले. अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींच्या पाचव्या बॅचचा दीक्षांत सोहळा शुक्रवारी बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे पार पडला.
22 आठवड्याचे प्रशिक्षण
22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन 1634 अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थी देशसेवेत रुजू झाले. यामध्ये पुरुष अग्निवीरांसह महिला अग्निवीरांचाही समावेश आहे. एअर व्हॉईस मार्शल पीसीपी आनंद यांनी अग्निवीरांची मानवंदना स्वीकारली. सर्वोत्तम प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रशिक्षणार्थी श्वेता यांचा गौरव
अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थी श्वेता यांना सर्वोत्तम कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. क्रिश परगई, आशिशकुमार, प्रवीणकुमार यांचा त्यांच्या कामगिरीबद्दल एअर व्हॉईस मार्शलांच्यावतीने सन्मान करण्यात आला. या सर्व प्रशिक्षणार्थींना देशसेवेची शपथ देण्यात आली. अग्निवीरांच्या कुटुंबीयांसाठी ही अभिमानास्पद बाब होती. या शानदार सोहळ्याचे ते साक्षीदार ठरले.