बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ‘एमडी’ पदावरून अग्निहोत्रींना हटविले
राजेंद्र प्रसाद यांना मिळाला प्रभार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) सतीश अग्निहोत्री यांना तत्काळ प्रभावाने पदावरून दूर केले आहे. 1 जुलै 2021 रोजी अग्निहोत्री यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या (बुलेट ट्रेन) व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात आले होते. अग्निहोत्री यांच्या जागी आता बुलेट ट्रेन प्रकल्पाचे संचालक (प्रकल्प) राहिलेले राजेंद प्रसाद यांना तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्थापकीय संचालक करण्यात आले आहे. प्रसाद यांना हा प्रभार अतिरिक्त स्वरुपात देण्यात आला आहे.
सतीश अग्निहोत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे समजते. परंतु संबंधित प्रकल्पाच्या अधिकृत प्रवक्त्याने याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला आहे. अग्निहोत्री हे सुमारे 9 वर्षांपर्यंत रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक राहिले आहेत. या कार्यकाळादरम्यान रेल्वेमार्ग निर्मितीच्या कंत्राटावरून त्यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. सतीश अग्निहोत्री हे आयआयटी रुडकीचे माजी विद्यार्थी आहेत.
बुलेट ट्रेन प्रकल्प तांत्रिक आणि आर्थिकदृष्टय़ा थेट जपान आणि भारत सरकारदरम्यान झालेल्या कराराशी संबंधित आहे. अशा स्थितीत याच्या सर्व कामांसाठी सातत्याने जपान सरकारचा सहभाग असतो. याचमुळे गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला या प्रकल्पाच्या प्रमुखपदी न ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्रात यापूर्वी सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यास अनेक अडथळे निर्माण झाले होते. परंतु आता राज्यात सत्तांतर झाल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग मिळण्याची शक्यता आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमध्ये याचे काम वेगाने सुरू आहे. पुढील काळात महाराष्ट्राच्या हिश्श्यातील मार्गाच्या निर्मितीला आता वेग मिळणार आहे.