For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अग्निहोत्र उपासना सर्वांसाठी कल्याणकारी

10:41 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
अग्निहोत्र उपासना सर्वांसाठी कल्याणकारी
Advertisement

बेळगाव : अग्निहोत्र हा कल्याणकारी विधी आहे. स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी एका विशिष्ट आकाराच्या पात्रामध्ये (पिरॅमिड) गोमयाच्या तुकड्यांना (शेणी) गाईचे तूप लावून पाच ते सात मिनिटे आधी प्रज्वलित करून दोन चिमटी तांदूळ हातात घेऊन ठरावीक मंत्र म्हणून तांदूळ त्या अग्निमध्ये अर्पण करावयाचे. हा विधी म्हणजे अग्निहोत्र होय. आज अग्निहोत्र दिवस असून या निमित्ताने गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ अग्निहोत्र नित्यनेमाने करत असणारे व अग्निहोत्राचे प्रसारक, अभ्यासक, लेखक एस. के. कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली. बेळगाव येथील एक्स्पर्ट इंजिनिअरिंग येथे होणाऱ्या अग्निहोत्र विधीसाठी ते खास बेळगावला आले आहेत. या निमित्ताने त्यांनी अग्निहोत्रबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, शुद्ध व पवित्र वातावरणाची निर्मिती आपल्या नित्य उपासनेने आपल्या सभोवार निर्माण करणारे जे कोणी आहेत, त्यांना यज्ञार्ह: म्हटले जाते. यज्ञात समर्पण केलेल्या आहुती वातावरणामध्ये वायुरुपाने पसरतात. हा यज्ञ किंवा अग्निहोत्राची नित्य उपासना ही सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.

Advertisement

यज्ञ म्हणजे अग्नित मंत्रोच्चारासह आहुती देणे. अग्नित आहुती देणे म्हणजेच अग्निहोत्र. कोणताही यज्ञ अग्निविना होत नाही. एका अर्थाने अग्निहोत्र म्हणजे यज्ञाचे मुखच होय. अग्निहोत्राचे वैशिष्ट्या काय? या प्रश्नावर ते म्हणाले, अग्निहोत्राची उपासना सार्वत्रिक आहे. आज केवळ भारतातच नव्हे तर जगातील 50 हून अधिक देशांमध्ये अगदी अझरबैजानमध्येसुद्धा अग्निहोत्र केले जात आहेत. अग्निहोत्रासाठी कोणाकडूनही दान मागावे लागत नाही. कोणावरही सक्ती केली जात नाही. अत्यल्प खर्च, अत्यल्प वेळ आणि कोठेही करण्याजोगा हा विधी आहे. अग्निहोत्राची उपासना कशासाठी? असे विचारता ही उपासना म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता आहे. आपण निसर्गाकडून सर्व काही घेतो. पण त्याच्या प्रति कृतज्ञ नसतो. त्याला आपण काही देत नाही. अग्निहोत्र विधीच्या माध्यमातून आपण निसर्गाप्रती कृतज्ञ राहू शकतो. अग्निहोत्राच्या विधीनंतर निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे वातावरण शुद्ध होते. याचा अनुभव आपल्याला कोरोना काळात आलेला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

अग्निहोत्र विधीमुळे काय साध्य होते? या प्रश्नावर ते म्हणाले, ही काही सक्तीने करण्याची उपासना नाही. जे तुम्ही अनुभवता, त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही अग्निहोत्र विधी सुरू करा आणि त्यानंतर तुम्हाला जे अनुभव येतील, त्यावरून तुमच्याच लक्षात येईल, की हा विधी किंवा उपासना किती सकारात्मक ऊर्जा देतो. या उपासनेमुळे मन शांत होते, ताणतणाव कमी होतात, हे मात्र निश्चित. अक्कलकोटनिवासी परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांनी वेदाचे सार म्हणून जो पंचसाधना मार्ग दिला, त्यात मुख्यत्वे अग्निउपासनेवर भर दिला आहे. वेद, यज्ञ, पंचतत्व, नित्याची उपासना, अग्निहोत्र अर्थात वैश्विक उपासना यामध्ये महत्त्वाची आहे. यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय यावर वेदांनी भर दिला आहे आणि वेदांनी दिलेले ज्ञान हे सर्व जगाला उपयोगी ठरणारे आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अग्निची उपासना ही जगभरात सर्वत्र केली जाते. कारण ती सूर्याची उपासना आहे. मात्र, वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचे स्वरुप वेगवेगळे आहे. परंतु, जगातील सर्व लोकांसाठी कळत नकळत अग्निहोत्राची उपासना ही सार्वत्रिकच आहे. अग्निहोत्राची उपासना ही पूर्णपणे स्वयंनिर्भर असून ती सर्वांना सुखी करणारी, परोपकारी अशीच आहे आणि परोपकार हा धर्माचा पाया आहे. मुख्य म्हणजे यामध्ये कोणताही भेदभाव नाही. जीवात जीव  असेपर्यंत पृथ्वीतलावरील कोणतीही व्यक्ती अग्निहोत्र उपासना करू शकते आणि स्वत:च त्याचा अनुभव घेऊ शकते, असे ते म्हणाले.

Advertisement

आज अग्निहोत्र आणि मार्गदर्शन

बेळगावमध्ये अग्निहोत्र उपासना करणारी काही मंडळी एकत्र आली आहेत. ते वैयक्तिक आणि सामूहिक स्वरुपात अग्निहोत्र करतात. विनायक लोकुर संचालित एक्स्पर्ट इंजिनिअरिंग येथे मंगळवारी सायंकाळी सामूहिक अग्निहोत्र होणार आहे. यावेळी वे.शा.सं. संजीवाचार्य वाळवेकर हे मंत्रपठण करणार आहेत. त्यानंतर एस. के. कुलकर्णी अग्निहोत्र उपासनेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

Advertisement
Tags :

.