अग्निपथ हिंसा, रेल्वेचे हजार कोटींचे नुकसान
12 लाख लोकांचा प्रवास थांबला ः 1.5 लाख प्रवासी अडकून पडले ः 70 कोटी रुपयांचा करावा लागला रिफंड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागील 4 दिवसांपासून अग्निपथ योजनेवर देशाच्या अनेक भागांमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. योजनेला विरोध करणाऱयांनी केलेल्या हिंसेत रेल्वेगाडय़ांना सर्वाधिक लक्ष्य करण्यात आले आहे. या हिंसेत रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांना करण्यात आलेला रिफंड (परत केलेली रक्कम) मिळून सुमारे 1 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे मानले जात आहे. याचबरोबर 12 लाख प्रवाशांना प्रवासाची योजना रद्द करावी लागली आहे. 922 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. 120 मेल एक्स्प्रेस आंशिक स्वरुपात रद्द झाल्या आहेत.
दीड लाख प्रवाशांना अर्ध्या मार्गावरच रेल्वेतून बाहेर पडावे लागले आहे. 5 लाखांहून अधिक पीएनआर रद्द झाले. सुमारे 70 कोटी रुपयांचा रिफंड प्रवाशांना देण्यात आला. पूर्व-मध्य रेल्वे विभागाला 241 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या नुकसानाला तोंड द्यावे लागले आहे. सार्वजनिक संपदेला निदर्शकांकडून अंदाधुंद स्वरुपात लक्ष्य करण्यात येत आहे.
4 दिवसांमध्ये देशभरात 922 मेल एक्स्प्रेस रेल्वेगाडय़ा रद्द झाल्या आहेत. तर 5 लाखांहून अधिक पीएनआर रद्द झाले आहेत. प्रत्येक रेल्वेत सरासरी 1200 ते 1500 प्रवासी असतात, यामुळे सुमारे 12 लाख लोकांना प्रवासाचा विचार गुंडाळावा लागला आहे. अनेक ठिकाणी रेल्वेगाडय़ा अर्ध्यावरच रोखण्यात आल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. आणखी काही दिवस उत्तर भारतात रेल्वेसेवा पूर्ववत होणे शक्य नसल्याचे मानले जात आहे.
अग्निपथ योजनेवरून 19 राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. यादरम्यान उत्तरप्रदेश-बिहारमध्ये सार्वजनिक संपदेला सर्वाधिक नुकसान पोहोचविण्यात आले आहे. नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरोचा 2020 मधील अहवाल पाहिल्यास अशा प्रकारच्या घटनांमध्ये 28 टक्क्यांपर्यंत घट झाली होती. परंतु उत्तरप्रदेशसह 6 राज्यांमध्ये अशा घटना वाढल्या होत्या. अशाप्रकारच्या घटनांमध्ये उत्तरप्रदेश (2217) पहिल्या स्थानी आहे. तर तामिळनाडू (668) दुसऱया स्थानावर आहे.
बिहारमध्ये सर्वाधिक हिंसा
अग्निपथ योजनेवरून उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, पंजाब, हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशातील 60 हून अधिक जिल्हय़ांमध्ये हिंसक घटना घडल्या आहेत. या हिंसेत आतापर्यंत 2 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर जाळपोळ आणि तोडफोडीमुळे आतापर्यंत 1 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. बिहारमध्ये या योजनेच्या विरोधात सर्वाधिक हिंसा झाली आहे. तेथील कोचिंग सेंटर्सचा या हिंसेमागे हात असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. योजनेच्या विरोधात भारत बंदचे आवाहन करण्यात आल्याने दिल्ली-एनसीआर समवेत अनेक शहरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. दुसरीकडे सरकारने अग्निपथ योजना मागे घेण्यास नकार देत तरुण-तरुणींकरता अनेक मोठय़ा घोषणा केल्या आहेत.