तलावात पाणी सोडण्यासाठी आंदोलन
जांबगी येथे संतप्त नागरिकांकडून अधिकाऱ्यांचा निषेध
विजापूर : जिह्यातील जांबगी येथील तलावात पाणी सोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याची तालुका व जिल्हा प्रशासनाने दखल न देता केवळ दिवस घालविण्याचे काम केल्याने संतप्त नागरिकांच्यावतीने तलाव आवारात अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निधेष व्यक्त केला. तसेच तलावात त्वरित पाणी सोडण्यात यावे, यासाठी आंदोलनही करण्यात आले. यावेळी माजी ग्रा. पं. सदस्य संगमेश गुडाळे म्हणाले, केबीजेएनएल अधिकाऱ्यांनी तलावात पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. जांबगी तलाव हा जिह्यातील दुसरा सर्वात मोठा तलाव आहे. हुन्श्याळ (मडाळा) तलाव पाण्याने भरल्यास आजूबाजूच्या 5-6 गावातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. याशिवाय पाणी उपलब्ध झाल्यास पशूधन सांभाळणे शक्य होणार आहे. या भागाची भूजल पातळी कमी झाल्याने कूपनलिका व विहीरींची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. सदर समस्या सोडविण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.