For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणबर्गीत झोपडपट्टीवासियांचे आंदोलन

10:08 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
कणबर्गीत झोपडपट्टीवासियांचे आंदोलन
Advertisement

आमदार राजू सेठ यांनी दिले समस्या सोडविण्याचे आश्वासन :  कामे अर्धवट असताना इमारती जीर्ण होण्याचा प्रकार

Advertisement

बेळगाव : कणबर्गी येथील सागरनगरमध्ये झोपडवासीयांसाठी इमारती उभे करण्यात आल्या. मात्र केवळ पाच वर्षांत त्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. याचबरोबर या परिसरात कोणत्याच मूलभूत सुविधा नसल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. तेव्हा तातडीने आमच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी  झोपडपट्टीवासीयांनी आमदार राजू सेठ व महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. पाणी, गटारी, रस्ते नसल्यामुळे येथील कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकूण 20 अपार्टमेंट उभे केले आहेत. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये 16 कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र काही जणांनी भाड्याने फ्लॅट दिले आहेत, असा आरोपही या निवेदनात केला आहे.

सुविधा नसल्याने मोठी गैरसोय

Advertisement

येथील अनेक कामे अर्धटवटच आहेत. कामे अर्धवट असताना इमारती जीर्ण होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कोणत्याच सुविधा नसल्यामुळे येथील सर्वच कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे पाणीपुरवठा केला जात नाही. सध्या आमदार राजू सेठ यांनी 1 कूपनलिका खोदाई करून दिली आहे. मात्र इतक्या कुटुंबांना कूपनलिकेचे पाणी मिळणे अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने पाण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे.

झोपडीमध्ये राहणाऱ्यांना घरे बांधून द्या

सागरनगरला लागूनच अनेक जण झोपडीमध्ये राहात आहेत. त्यांनाही घरे बांधून द्यावीत, असेही या निवेदनात म्हटले आहे. हक्कपत्रे दिलेले काही जण या इमारतीमध्ये आलेच नाहीत. जे फ्लॅट खाली आहेत ते इतरांना तातडीने द्यावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली. यावेळी विष्णू इंगळी, कृष्णा मिराळू, यल्लव्वा हालमन, यमनव्वा बागडी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

आमदारांनी मांडले खाली ठाण

झोपडट्टीवासियांनी महापालिकेच्या नूतन इमारतीजवळ ठाण मांडले होते. हे पाहून आमदार राजू सेठ हे देखील समोरच्या पायऱ्यांवरच बसून राहिले. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी उपायुक्त उदयकुमार तळवार, अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांना बोलावून घेऊन समोरासमोर चर्चा केली. तातडीने त्या समस्या सोडविण्याची सूचना देखील त्यांनी यावेळी केली आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी येणार होते. त्यासाठी हे झोपडपट्टीवासीय आले होते. मात्र काही कारणास्तव पालकमंत्री आले नाहीत. त्यामुळे त्यांचे सचिव मलगौडा पाटील यांनी देखील निश्चितच पालकमंत्र्यांच्या कानावर घालू व समस्या सोडवू असे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :

.