For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घोटगाळी ग्रा. पं. क्षेत्रातील रोहयो मजुरांचे ठिय्या आंदोलन

10:45 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
घोटगाळी ग्रा  पं  क्षेत्रातील रोहयो मजुरांचे ठिय्या आंदोलन
Advertisement

नागरगाळी वनाधिकाऱ्यांविरोधात संताप : वनक्षेत्रात काम देण्याची संतप्त मजुरांची मागणी

Advertisement

खानापूर : तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील रोहयो मजुरांना नागरगाळी वनक्षेत्रात काम देण्यात येत नसल्याने शुक्रवारी नागरगाळी विभागीय वन विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.नरेगा योजनेंतर्गत मजुरांना काम न दिल्याने नागरगाळी विभागीय वन अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.वनविभागाने ‘रोहयोंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत, या मागणीसाठी गुरुवारी मजुरांनी घोटगाळी ग्रामपंचायतच्या आवारात ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलनाचे वृत्त समजल्यानंतर रोहयो सहायक संचालक रुपाली बडकुंद्री यांच्यामार्फत नागरगाळी वनविभागाचे वनाधिकारी प्रशांत यांच्याशी संपर्क साधून मजुरांना वनक्षेत्रात कामे देण्याची विनंती केली.

परंतु, वनाधिकारी म्हणाले की, रोहयो वनक्षेत्रातील मजुरांना काम देऊ शकत नाही. त्यामुळे संतापलेल्या मजुरांनी शुक्रवारी थेट नागरगाळी वनाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.  नागरगाळी विभागीय वनाधिकारी कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करणाऱ्या पन्नासहून अधिक मजुरांनी संताप व्यक्त केला आहे.घोटगाळी ग्राम पंचायती अंतर्गत असलेली सर्व गावे वनक्षेत्राने वेढलेली आहेत. वनपरिक्षेत्र वगळता इतर ठिकाणी कामाची जागा नसल्याने, वनक्षेत्रात खंदक, सीपीटी व इतर कामे करण्यास परवानगी देण्याचे निवेदन ग्रा. पं. कार्यालयामार्फत, वनविभागाला देण्यात आले आहे. निवेदन देऊन अनेक दिवस उलटले, तरी संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे रोहयोवर पोट भरणाऱ्या शेकडो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने मजुरांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले.

Advertisement

आश्वासनानंतर आंदोलन मागे

शेवटी वनाधिकाऱ्यांनी मजुरांशी चर्चा करून मजुरांचे निवेदन स्वीकारले. तसेच येत्या काही दिवसात वनक्षेत्रात काम देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मजुरांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. येत्या आठ दहा दिवसात काम न दिल्यास पुन्हा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मजुरांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.