For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुतगे कृषी पत्तीनसमोर तिसऱ्या दिवशीही ठिय्या

11:15 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुतगे कृषी पत्तीनसमोर तिसऱ्या दिवशीही ठिय्या
Advertisement

बिनव्याजी कर्जाचे वितरण न केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा : ...तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

Advertisement

वार्ताहर /सांबरा

मुतगे येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या कार्यालयासमोर बिनव्याजी कर्जाचे वितरण न केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी छेडलेले ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. या आंदोलनातील युवा शेतकरी सचिन पाटील यांनी अन्नाचा त्याग करत उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार सचिन पाटील यांनी केला आहे. त्यामुळे गावातील वातावरण तापले आहे. शासनामार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना कृषी पत्तीन संघाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जाचे वितरण करण्यात येते. वास्तविक पाहता जानेवारीमध्ये बिनव्याजी कर्जाचे वितरण करणे गरजेचे होते. मात्र, सहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना अद्याप कर्जाचे वितरण केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण व ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला आहे.

Advertisement

अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांबरोबरची बैठक निष्फळ

शेतकऱ्यांनी आंदोलन छेडल्याचे समजतात सहकार खात्याचे संयुक्त निबंधक, साहाय्यक निबंधक, मारिहाळ पोलीस स्थानकाचे पीएसआय मंजुनाथ नाईक व इतर अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली व समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर योग्य तोडगा न निघाल्याने सदर बैठक निष्फळ ठरली.

अधिकाऱ्यांकडून सेक्रेटरी धारेवर

कृषी पत्तीन सेक्रेटरीच्या निक्रियतेमुळे व योग्य वेळेत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाले नसल्याचे बैठकीत उघड झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सेक्रेटरीला चांगलेच धारेवर धरले व शेतकऱ्यांना तातडीने कर्ज मिळावे यासाठी अधिकारी सरसावले आहेत. संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन शेतकऱ्यांना पत वाढवून बिनव्याजी कर्जाचे वितरण करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. बँक इन्स्पेक्टर स्वत: संबंधित कागदपत्रांची जमवाजमव करत आहेत.

उपोषण कर्त्याची प्रकृती खालावली

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्ज रक्कम जमा होत नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार सचिन पाटील यांनी केला आहे. तसेच कृषी पत्तीन संघाचा बारा वर्षांचा ऑडिट रिपोर्ट व या कालावधीत संघात कोणीही गैरव्यवहार केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सचिन पाटील यांचा बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. त्यांची प्रकृती काहीशी खालावत चालली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी आरोग्य पथक दाखल झाले आहे. परिस्थितीवर मारिहाळ पोलीसही नजर ठेवून आहेत.

Advertisement
Tags :

.