जन्माला येतानाच वृद्धत्व
सर्वसाधारणपणे कोणताही माणूस जन्म, बालपण, तरुणपण, प्रौढत्व आणि वृद्धत्व अशा पाच स्थितींमधून मार्गक्रमणा करतो, हे सर्वांना परिचित आहे. तथापि, काहीवेळा असा काही चमत्कार घडतो, की या पाच स्थितींसंबंधी पुनर्विचार करावा लागतो. झारा हार्टशोन नामक एका महिलेच्या आयुष्यात असा प्रसंग आलेला आहे. झारा हार्टशोन जन्माला येतानाच वृद्धत्वाच्या स्थितीत होती. ती सोळा वर्षांची होईपर्यंत जख्ख म्हातारी झाली आहे. असे कसे झाले, हे आता स्पष्ट झाले आहे.तिला जन्मत:च ‘लिओडीस्ट्रॉफी’ नामक अत्यंत दुर्मिळ विकाराने घेरले आहे. हा विकार लक्षावधी लोकांमधून एखाद्यालाच होतो. या विकारात माणूस अतिशय लवकर म्हातारा होतो. या विकाराला आजही औषध नाही. केवळ प्लॅस्टिक सर्जरी करुन चेहऱ्याचे स्वरुप काही प्रमाणात परिवर्तीत करता येते. झारा हार्टशोन हिचा जन्म झाला, तेव्हाच तिचे रुप पाहून डॉक्टर्सनाही चिंता वाटू लागली होती. तसे पाहिल्यास तिची प्रकृती अगदीच निर्दोष होती. तथापि, तिचा चेहरा नवजात अर्भकाच्या मानाने बराचसा जून वाटत होता. नंतर वयाच्या चौथ्या वर्षापासूनच तिची त्वचा सैल पडू लागली, तेव्हा तिची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिला हा दुर्धर विकार असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या या वेगळ्या रुपामुळे समाजात तिची चेष्टा होत असे. तिला वयाच्या दहाव्या वर्षापासूनच आजी असे संबोधले जात असे. तथापि, तिने ते मनाला लावून न घेता, स्वत:ला परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत तिचे स्वरुप जवळपास 80 वर्षांच्या वृद्ध महिलेप्रमाणे झाले आहे. तिचा चेहरा टवटवीत दिसावा, म्हणून डॉक्टरांनी तिच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी करुन तो थोडा उजळ करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही तिचे ‘वय’ लपत नाही. मात्र, अशाही परिस्थितीत तिने धीर न सोडता तिचे शिक्षण आणि इतर कार्ये चालूच ठेवली आहेत. हा विकार हेरिडेटराहृ अर्थात अनुवांशिक स्वरुपाचा आहे. झारा हिच्या आईलाही तो आहे. पण लक्षणे अतिशय सौम्य असल्याने तिला त्याचा विशेष त्रास जाणवला नव्हता. पण झारा हिची लक्षणे तीव्र असल्याने ती हे अगदीच अकाली आलेले ‘लपवू’ शकत नाही. पण आता तिच्या धीरोदात्तपणाचे कौतुक होऊ लागले आहे. तसेच, अशा परिस्थितीतही तिने स्वत:ला कार्यरत ठेवले असून या विकाराने पिडीत असणाऱ्यांसाठी एक आदर्श म्हणून तिच्याकडे बघितले जाऊ लागले आहे.