Kolhapur News : पेठवडगाव स्मशानभूमी शेजारी भानामतीचा अघोरी प्रकार उघडकीस ; नागरिकांमध्ये भीती
पेठवडगावच्या तांबवे वसाहतीत अघोरी प्रकरणाचे रहस्य उघडकीस
पेठवडगाव : पेठवडगाव इथल्या तांबवे वसाहत परिसरातील स्मशान भूमी शेजारी भानामतीचा प्रकार उजेडात आला आहे. एका बुट्टी मध्ये लिंबू दोरा,भात,तांदूळ, ब्लाउज पीस, काकण हळद कुंकू, मंगळसूत्र, काळ्या,भावल्या यासह जिवंत कोंबडा आढळला असून याबाबत परिसरातून भीती व्यक्त होत असून नागरिकांच्या मध्ये संताप ही निर्माण झाला आहे.
हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहराच्या हद्दीतील तांबवे वसाहत शेजारी असणाऱ्या स्मशानभूमी लगत एका काटेरी बाभळीच्या झाडा शेजारी एक बुट्टी आढळून आलीअसून त्या बुट्टीमध्ये लिंबू,दोरा,भात,तांदूळ, ब्लाउज पीस, काकण हळद कुंकू, मंगळसूत्र, पाच ते सहा काळ्या भावल्या, नारळ, उदकाडी, गुलाल, पांढरे कापड, केसांना बांधायचा बो,फुले यांनी गच्च भरलेली बुट्टी आढळून आली.
त्या परिसरातच एक जिवंत कोंबडा सोडण्यात आला होता त्या कोंबड्याच्या एका पायाला काळ्या दोऱ्याने काहीतरी बांधलेले होते. तर स्मशानभूमीच्या दुसऱ्या बाजूला एका कापडात नारळ बांधलेला आणि लिंबू अशा वस्तू टाकल्या होत्या. हा प्रकार आज सकाळी उघडकीस येताच तांबवे वसाहतीतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा अघोरी प्रकार पुन्हा घडल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचीही शक्यता वर्तवली जात असून पोलीस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून संबंधितांचा शोध घ्यावा आणि कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांच्यातून होत आहे.