पाच लाखाची लाच घेताना पंटर जाळ्यात
शाहूवाडी तहसीलदार कार्यालयातील प्रकार : प्रलंबित काम करून देण्याचे आमिष
कोल्हापूरः शाहूवाडी
शाहूवाडी तहसीलदार कार्यालयातील प्रलंबित काम करुन देण्याच्या आमिषाने पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पंटरला रंगेहाथ पकडले. सुरेश जगन्नाथ खोत (वय ४९, रा. भैरवाडी ता. शाहूवाडी) असे त्याचे नाव आहे. प्रलंबित जमिनीचा कागदोपत्री फेरफार करुन देण्याच्या मोबदल्यात ठरलेली लाच स्वीकारताना ही कारवाई केली. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बुधवारी सकाळी सापळा रचून ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे मामे भाऊ व त्यांचे सहहिशेदार यांनी मौजे सावे येथे जमीन खरेदी केली आहे . या जमिनीच्या गट नंबरच्या फेरफार मध्ये खाडाखोड करून सदर गट नंबर चुकीचे नोंद केले आहेत. असे करणाऱ्या विरोधात कारवाई करावी व पूर्ववत सातबारा करून द्यावा यासाठी तक्रारदार व त्यांचे मामेभाऊ यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला होता .या प्रकरणाची सुनावणी तहसीलदार कार्यालय शाहूवाडी येथे सुरू होती. सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी तक्रारदार हे तहसीलदार कार्यालय शाहूवाडी येथे गेले असता. त्यांना सुरेश खोत यांनी तुमचे तहसीलदार कार्यालयातील प्रलंबित असलेले काम करून देतो यासाठी पाच लाख रुपयाची मागणी केली. याबाबतची तक्रारदार यांनी लाच लुचपत विभाग कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
यानुसार लाच लुचपत विभागाने सापळा रचून पंच व साक्षीदारांच्या समक्ष सुरेश खोत यांना ५ लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत त्यांच्या विरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस उपायुक्त अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे डॉ. शिरीष सरदेशपांडे , श्री विजय चौधरी पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे , अप्पर पोलीस अधिक्षक डॉ शितल जान्हवे , अप्पर पोलीस अधिक्षक विजय चौधरी , यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील कोल्हापूर यांच्या सह सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश भंडारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास माने , पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप काशीद, पोलीस नाईक सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील, चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे ,आदींच्या पथकाने ही कारवाई केली .
यावेळी उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, लाचेच्या अथवा अफसंपदेबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले .
तहसीलदार यांची प्रतिक्रिया
दरम्यान, या कारवाई बाबत तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या नावाचा गैरवापर करून कोणी रक्कमेची मागणी केली असेल तर संबंधीतानी तात्काळ लाच लुचपत विभागाशी अथवा थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आव्हान रामलिंग चव्हाण यांनी केले आहे.