भाजपमध्ये आता वयाची अट
मंडळ अध्यक्षासाठी 45, तर जिल्हा अध्यक्षासाठी 60 वर्षे वयोमर्यादा
प्रतिनिधी/ पणजी
भारतीय जनता पक्षामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय गोवा नेतृत्वाने घेतल्याने आता भाजपच्या मंडळ आणि जिल्हा अध्यक्षांसाठी वयाची अट लावण्यात आली आहे. मंडळ भाजप अध्यक्षपदासाठी 45 वर्षे कमाल वयोमर्यादा गरजेची असून, जिल्हा अध्यक्षांसाठी 60 वर्षे कमाल वयोमर्यादा भाजप पक्षाने लागू केली आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे गोवा भाजपातील नेत्यांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
वयाच्या अटीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याने राज्यातील सर्व मतदारसंघातील भाजपचा नवा मंडळ अध्यक्ष हा 45 वर्षांहून कमी वयोगटातील निवडला जाणार आहे. उपाध्यक्ष किंवा सचिव, सरचिटणीस यांना वयोमर्यादेची अट लावण्यात आलेली नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्ष हितासाठी आणि पक्ष वाढीसाठी योगदान देत आलेला आहे. सर्वच मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ही भाजपची ताकद आहे, तरीही वयोमर्यादेत बदल करणे महत्त्वाचे ठरल्याने 45 वर्षांहून कमी वयोगटातील मंडळ अध्यक्ष ठेवण्याचा विचार पुढे आला. जिल्हा अध्यक्ष हा 60 वर्षांहून अधिक वयोगटाचा नसावा, याबाबतही विचारमंथन करण्यात आले. यामध्ये कुणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही. परंतु पक्षाचे कार्यही वाढल्याने वयोमर्यादेचा विचार करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.
तानावडे यांनी सांगितले की, भाजप पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांविषयी दिल्लीत निर्णय होणार आहे. त्यानंतर केंद्रीय निरीक्षक गोव्यात आल्यानंतर वयोमर्यादेबाबची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. गोवा भाजपच्या संघटनात्मक निवडणुका जानेवारीत होणार असल्याने त्यापूर्वीच वयोमर्यादेबाबत निर्णय घेतला जाईल, असेही तानावडे यांनी सांगितले.