सुगंधाविनाच अगरबत्ती प्रकल्प रखडला
टाकाऊ फुले जाग्यावरच : मनपाचे दुर्लक्ष
बेळगाव : टाकाऊ फुलांपासून अगरबत्ती तयार करण्याचा प्रकल्प पूर्णपणे रखडला आहे. गतवर्षी फलोत्पादन खात्याच्या परवानगीने मनपाने या प्रकल्पासाठी काम हाती घेतले होते. मात्र, सुरुवातीचा काही काळ वगळता पूर्णपणे हा प्रकल्प थांबला आहे. त्यामुळे टाकाऊ फुलांचा सुगंध न दरवळताच रखडल्याचे बोलले जात आहे. अशोकनगर येथील होलसेल फूलबाजारात दररोज मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते. मात्र, यापैकी काही फुले लिलावानंतर जागीच टाकून दिली जातात. अशा फुलांवर पुनर्प्रक्रिया करून अगरबत्ती तयार करण्याचा प्रकल्प राबविण्यात आला होता.
यामुळे मनपाच्या उत्पादनातही वाढ होणार होती. मात्र, प्रकल्प काही दिवसातच रेंगाळल्याने टाकाऊ फुले जाग्यावरच पडून आहेत. त्यामुळे दुर्गंधीचा प्रश्नही कायम आहे. फूलबाजारात बेळगाव, निपाणी, चिकोडी आणि इतर राज्यातूनही वेगवेगळ्या फुलांची आवक होते. यामध्ये विशेषत: झेंडूच्या फुलांचाही वाटा मोठा आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव काळातही आवक वाढली होती. मात्र, विक्री न झालेल्या फुलांचा ढीग बाजारात पडून आहे. याबरोबर गुलाब, शेवंती आणि इतर फुलेही यामध्ये दिसत आहेत. प्रकल्पच बंद झाल्याने टाकाऊ फुले परिसरात जैसे थेच दिसत आहेत.
बागायत खात्याची परवानगी पण..
मनपाने फूलबाजारात शिल्लक राहिलेल्या फुलांसाठी अगरबत्ती प्रकल्प राबविला आहे. बागायत खात्याने यासाठी परवानगी आणि सहकार्याची भूमिका दाखवली आहे. मात्र, मनपाकडूनच यामध्ये सुरळीतपणा दिसत नाही.
- महांतेश मुरगोड (सहसंचालक बागायत खाते)