आमचं ठरलंय' नंतर 'कंडका पडणार': आता' १८ ऑक्टोबर तुम्ही माझ्या बरोबर'ची बॅनरबाजी, सतेज पाटील यांचे 'बॅनर वॉर'
इकबाल रेठरेकर
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच जिल्ह्याचे राजकीय तापमान वाढू लागले आहे. ही निवडणूक महायुती विरुद्ध काँग्रेसचे आमदार सतेज पाटील अशी होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारी अर्ज, बैठका आणि मोर्चेबांधणी सुरू असतानाच आता कोल्हापूर शहरातील चौका-चौकांत झळकू लागलेल्या बॅनरनी राजकीय चर्चेला आणखी हवा दिली आहे. '१८ ऑक्टोबर, तुम्ही माझ्या बरोबर' दूध संस्थांच्या बाजूने लढणारा सतेज नेता असा थेट संदेश देणारे आमदार सतेज पाटील यांचे बॅनर झळकू लागल्याने गोकुळच्या निवडणुकीत राजकीय शक्तिप्रदर्शनाची नवी रंगत पहायला मिळत आहे.
गोकुळची निवडणूक ही केवळ दूध उत्पादक संस्थांची निवडणूक राहिलेली नाही. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या निवडणुकीतून आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरणार असल्याने महायुती आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच सतेज पाटील यांच्या समर्थकांकडून शहरभर लावण्यात आलेल्या बॅनरमधून '१८ ऑक्टोबरला आमच्यासोबत या" असा अप्रत्यक्ष राजकीय संदेश दिला जात असल्याची चर्चा आहे. सतेज पाटील यांच्या राजकीय शैलीत निवडणुकीपूर्वी टॅगलाईन मधून वातावरण निर्मिती करण्याला विशेष महत्त्व राहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'आमचं ठरलंय" या टॅगलाईनने कोल्हापूरच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण केली होती. राजकीय संघर्षात खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात माजी खासदार संजय मंडलिक यांना पाठबळ देताना या टॅगलाईनने जिल्ह्याच्या राजकारणात वेगळाच संदेश दिला होता.
त्यानंतर राजाराम साखर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतही 'कंडका पडणार' या टॅगलाईनमुळे राजकीय वातावरण ढवळून काढले होते. आता गोकुळच्या निवडणुकीच्या ऑक्टोबर तुम्ही माझ्या बरोबर" हा नवा नारा पुढे आला आहे. त्यामुळे टॅगलाईनच्या माध्यमातून निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण तापविण्याची सतेज पाटील यांची शैली पुन्हा चर्चेत आली आहे.
गोकुळमधून जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा ?
गोकुळच्या निवडणुकीत कोणता गट वरचढ ठरतो, यावर केवळ दूध संघाचे भवितव्य अवलंबून नसून जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच निवडणूक जाहीर होताच नेत्यांच्या हालचाली, बैठका, मेळावे आणि आता बॅनरबाजीला वेग आला आहे.
बॅनरमधून नेमका संदेश कोणाला?
या बॅनरकडे केवळ प्रचाराचा भाग म्हणून न पाहता, आगामी निवडणुकीच्या राजकीय लढाईची मानसिक तयारी म्हणूनही पाहिले जात आहे. विशेष म्हणजे मतदानाची तारीख १८ ऑक्टोबर निश्चित झाल्यानंतर त्याच तारखेचा थेट उल्लेख करून मतदारांना 'माझ्यासोबत येण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. त्यामुळे या बॅनरमधून विरोधकांना आव्हान आणि समर्थकांना एकत्रित करण्याचा दुहेरी संदेश दिला जात असल्याची चर्चा आहे.