For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: वारी केल्यावर काय फळ मिळते?, ह.भ.प. अभय जगताप सांगतात...

03:07 PM Jun 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  वारी केल्यावर काय फळ मिळते   ह भ प  अभय जगताप सांगतात
Advertisement

वारकरी बनवण्यासाठीचा विधी अत्यंत सोपा आहे

Advertisement

By : ह.भ.प. अभय जगताप

सासवड :
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।1
काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ।धृ।

Advertisement

अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ।3तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ।4

या अभंगांमध्ये तुकोबांनी पंढरीची वारी करण्याचे आवाहन केले आहे व वारी केल्यावर काय फळ मिळते तेही सांगितले आहे. अर्थात हे सांगताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा महाराजांनी पहिल्याच ओळीत सांगितला आहे. तो म्हणजे यासाठी तुम्हाला आधी वारकरी व्हावे लागेल.

पंढरपूरला अनेक लोक दर्शनाला येत असतात. काहीजण फक्त एकदा येतात. फक्त एकदा येण्याला वारी म्हणता येणार नाही. वारीसाठी वारंवार यावे लागते. अर्थात इथे मनाने वारंवार येणे अपेक्षित नसून वारकरी संतांना अभिप्रेत असलेले नियम पाळून येणे अभिप्रेत आहे. वारकरी बनवण्यासाठीचा विधी अत्यंत सोपा आहे.

यासाठी कोणत्याही माळकरी-वारकरी व्यक्तीकडे जाऊन त्याच्या हाताने गळ्यात तुळशीची माळ घालून घेता येते. ही माळ तुळशीच्या लाकडाच्या मण्यांची बनलेली असते. माळ घातलेल्या व्यक्तीला माळकरी असेही म्हणतात. माळ घालताना माळकरी व्यक्ती वारकरी बनण्याचे नियम सांगतात.

माळ घातल्यावर मद्यपान, मांसाहार करू नये. परस्त्रीला मातेसमान व परपुरुष पांडुरंगासमान मानावा. रोज हरिपाठ म्हणावा, ‘राम कृष्ण हरी’जप करावा. पंधरा दिवसांनी येणाऱ्या एकादशीला उपवास करावा. प्रसंगी भजन, कीर्तनादी कार्यक्रमात सहभागी व्हावे.

वर्षातून किमान एक पंढरीची व एक संत क्षेत्राची वारी करावी. शक्य झाल्यास आषाढी वारी पायी करावी. आपले आचरण शुद्ध ठेवावे. वगैरे नियम सांगितले जातात. यामध्ये अजून एक नियम असतो तो म्हणजे शक्य झाल्यास रोज ज्ञानेश्वरी, गाथा वगैरे संत ग्रंथांचे एक पान तरी वाचावे. त्यामुळे आपल्याला संतांचे विचार कळतात. हे विचार कळले की त्याचा पुढचा टप्पा आचरणाचा असतो.

असे आचरणशील वारकरी बनणे संतांना अभिप्रेत आहे. अशाप्रकारे वारकरी होऊन पंढरपूर बघण्याचे म्हणजे पंढरीला जाण्याचे आवाहन तुकोबाराय अभंगात करतात. इतर वेगवेगळ्या साधनांनी मिळणारी फळं वारकऱ्यांना केवळ वारीने प्राप्त होतात. त्यामुळे इतर साधने करायची आवश्यकता राहत नाही.

एरवी अशाप्रकारे कोणतेही साधने नेमाने केले की त्या व्यक्तीला आपल्या नियमाचा, आपल्या भक्तीचा अभिमान उत्पन्न होतो. इथे मात्र हा वारकरी या अभिमानापासून दूर राहतो. शेवटी महाराज म्हणतात त्याच्या डोळ्यांमध्ये सावळा विठोबा बसतो. म्हणजे त्याला सर्व जग पांडुरंगमय दिसते. वारकरी बनून पंढरपूरला जाण्याचा हा सर्वात मोठा लाभ आहे.

Advertisement
Tags :

.