वनडेनंतर बांगलादेशचा टी-20 सामन्यातही न्यूझीलंडला दे धक्का
पहिल्या टी-20 लढतीत 5 गडी राखून दणदणीत विजय : तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशची 1-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/ नेपियर
बांगलादेशने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी साकारताना वनडेपाठोपाठ टी-20 सामन्यातही न्यूझीलंडला जोरदार धक्का दिला. बुधवारी झालेल्या उभय संघातील पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशने किवीजचा 5 विकेटने पराभव केला आहे. बांगलादेशने न्यूझीलंडला घरच्या मैदानावर टी-20 सामन्यात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक विजयाचा हिरो मेहदी हसन ठरला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 134 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 18.4 षटकांत 5 गडी गमावत 137 धावा काढून विजयावर शिक्कमोर्तब केले. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 29 रोजी होईल.
प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या एका धावेवर किवी संघाच्या तीन विकेट पडल्या. मेहदी हसनने पहिल्याच षटकात टीम सेफर्टला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पुढील षटकात शरिफुल इस्लामने फिन अॅलन (1) आणि ग्लेन फिलिप्स (0) यांना एकापाठोपाठ बाद केले. या खराब सुरुवातीनंतर डॅरेल मिचेल (14) व मार्क चॅपमन (19) चांगली सुरुवात केली. पण या दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. जेम्स नीशमने मात्र अवघ्या 29 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह सर्वाधिक 48 धावा करत संघाचे शतक फलकावर लावले. नीशमला कर्णधार मिचेल सँटनर (23) व अॅडम मिल्ने (नाबाद 16) यांनी चांगली साथ दिली. इतर तळाच्या फलंदाजांनी मात्र हजेरी लावण्याचे काम केल्याने न्यूझीलंडला 20 षटकांत 9 बाद 134 धावा करता आल्या. बांगलादेशकडून शरीफुलने तीन, मेहदी हसन आणि मुस्तफिझूर रहमानने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
बांगलादेशचा सहज विजय
किवीज संघाने विजयासाठी दिलेले 135 धावांचे आव्हान बांगलादेशने 18.4 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. लिटन दासने सर्वाधिक 36 चेंडूत नाबाद 42 धावांचे योगदान दिले. सौम्या सरकारने 22, कर्णधार नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. हसन यावेळी 19 धावांवर नाबाद राहिला. सलामीवीर रोनी तालुकदारने 10 धावांचे योगदान दिले. अफीफ हुसेनला 1 धावेवर तंबूत परतावे लागले. किवीज संघाकडून कर्णधार मिचेल सँटनर, टीम साऊदी, अॅडम मिल्ने, जेम्स नीशम आणि बेन सियर्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 9 बाद 134 (जेम्स नीशम 48, सँटनर 23, चॉपमन 19, मिल्ने नाबाद 16, शरिफुल इस्लाम 26 धावांत 3 बळी, मेहदी हसन, मुस्तफिजुर प्रत्येकी दोन बळी).
बांगलादेश 18.4 षटकांत 5 बाद 137 (लिटन दास नाबाद 42, मेहदी हसन नाबाद 19, सौम्या सरकार 22, साऊदी, मिल्ने, नीशम, सियर्स व सँटनर प्रत्येकी एक बळी).
वनडेपाठोपाठ टी-20 सामन्यातही बांगलादेशचा दे धक्का
मागील आठवड्यात उभय संघात वनडे मालिका झाली. यामधील तिसऱ्या वनडेत बांगलादेशने न्यूझीलंडला पराभूत केले होते. क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत वनडे सामन्यात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर वनडेपाठोपाठ टी-20 सामन्यातही बांगलादेशने यजमान किवीज संघाला पराभवाचा धक्का दिला आहे.