शिवपुतळा उभारणीनंतर आता शिवसृष्टी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट येथे पुन्हा एकदा अतिशय दिमाखदार आणि तेवढाच तेजोमय असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11 मे रोजी पूजन होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले. नौदलाच्या माध्यमातून यापूर्वी उभारण्यात आलेला शिवपुतळा वर्षाच्या आतच कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्याने समस्त शिवप्रेमींच्या हृदयावर भळभळती जखम झाली होती, ती आता भरून निघाली आहे. शिवपुतळा उभारणीनंतर आता राजकोट येथे 100 कोटी रुपये खर्चून शिवसृष्टी उभारली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मालवण राजकोट हे ठिकाण शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नकाशावर पर्यटनाच्यादृष्टीने कोकण झळकणार आहे.
मालवण राजकोट येथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे, खासदार नारायण राणे व आमदार अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवपुतळा पूजन कार्यक्रम झाला. शिवपुतळ्याच्या या उभारणीमुळे मालवणच्या अर्थातच कोकणच्या पर्यटन विकासात मोठी भर पडणार आहे. यापूर्वी उभारण्यात आलेला शिवपुतळा पाहण्यासाठी एक वर्षात 20 लाखांहून अधिक शिवप्रेमी व पर्यटकांनी भेट दिली होती. दुर्दैवाने तो पुतळा कोसळल्याने शिवपुतळा पुन्हा उभारला जाणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, तत्कालिन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि महायुती सरकारने राजकोट येथेच शिवपुतळा पुन्हा उभारणार, असे जाहीर करून कमीत कमी वेळेत शिवपुतळा उभारण्याचे काम पूर्णत्वास नेले. त्यामुळे समस्त शिवप्रेमींच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब असून समाधानही व्यक्त करण्यात येत आहे.
राजकोट मालवण येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण 4 डिसेंबर 2023 रोजी नौसेना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर पर्यटनानिमित्त कोकणात येणारे शिवप्रेमी, प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान असलेल्या छत्रपतींच्या राजकोट किल्ल्यावर त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी भेट देऊ लागले. लाखोंच्या संख्येने पर्यटन व शिवप्रेमींनी भेटी दिल्या. मात्र, दिमाखात उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना घडताच प्रत्येक शिवप्रेमींच्या हृदयावर भळभळती जखम झाली आणि अनंत काळ टिकणारा शिवपुतळा पुन्हा एकदा उभारला जाणार, की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
शिवपुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले होते. कोसळलेला शिवपुतळा पाहण्यासाठी गेलेल्या नेत्यांमध्ये राडा होण्याचा लांच्छनास्पद प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा एकदा शिवपुतळा उभारू, असे सत्ताधारी नेत्यांनी जाहीर केले. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या शिल्पकार व बांधकाम सल्लागारांवर गुन्हाही दाखल झाला. असं असलं, तरी जी दुर्घटना घडली, त्याबाबत कोणालाही माफ करता येणार नाही हे सत्य होते. त्यामुळे प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं जात होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असे सांगत जाहीर माफी मागितली होती. त्यामुळे राजकोट येथे कोसळलेला शिवछत्रपतींचा पुतळा पुन्हा उभारला जावा आणि शिवप्रेमींची भळभळती जखम भरली जावी, अशीच भावना सर्वांच्या मनात होती.
शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने राजकोट येथे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. शिवजयंती दिनीच सुवर्णयोग साधून 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवपुतळा उभारण्याची पायाभरणी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते झाली होती. नंतर शिवपुतळा उभारणीचे काम वेगाने सुरू झाले. शिवपुतळा उभारत असताना, पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्याचा परिणाम पुतळ्यावर होऊ नये, यासाठी ऑस्ट्रेलियन कंपनीकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
नव्याने उभारण्यात आलेला हा शिवपुतळा जमिनीपासून 93 फूट उंचीचा असून चबुतरा 10 मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर 60 फूट उंचीचा शिवपुतळा आणि शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल 23 फूट लांबीची आहे. पुतळ्यासाठी कांस्य धातूच्या आठ मिमी जाडीच्या पत्र्याचा उपयोग करण्यात आला आहे. यासाठी स्टेनलेस स्टील वापरण्यात आले. सुमारे 31 कोटी 75 लाख रुपये खर्च करण्यात आले असून उत्तर प्रदेश-गाझिपूर येथील मे. राम सुतार आर्ट क्रिएशनने हा पुतळा उभारला आहे. यापूर्वी उभारलेल्या शिवपुतळ्याच्याच दिशेने हा नवा पुतळा उभारला आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने शिवपुतळ्याचा दर्शनी भाग असून युद्ध भूमीवरील योद्ध्याच्या आवेशात हा शिवपुतळा उभारला असून छत्रपतींच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल आहे. राम सुतार व त्यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी अतिशय कमी वेळेत उभारलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
शिवपुतळा हा पुतळा देशातील सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्याची उंची 93 फूट आहे. ज्याप्रमाणे या पुतळ्याची रचना व उभारणी केली आहे, ती पाहता, किमान 100 वर्षे या पुतळ्याला कोणत्याही वातावरणात काहीही होणार नाही, असा विश्वास आणि दावाच मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे निश्चितच शिवप्रेमींच्या दृष्टीने नव्या शिवपुतळ्याची उभारणी आनंददायी मानावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बोलताना पुतळा उभारण्यात आलेल्या परिसरातील जागा ताब्यात घेऊन तेथे चांगल्या व्यवस्था उभ्या करणार आहोत. जेणेकरून आलेल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा एक चांगला अनुभव मिळावा. शिवाय पर्यटकांना याची भव्यता पाहता यावी, यासाठी आसपासचा परिसरही ‘शिवसृष्टी’ म्हणून विकसीत केला जाणार आहे, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे राजकोट किल्ला आणि परिसर शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि पर्यटक यांच्यासाठी आकर्षण ठरणार आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोकणचा विकास हा महायुती सरकारच्या अजेंड्यावर आहे. या भागाला गेल्या अडीच वर्षांत झुकते माप दिले गेले आहे. यापुढेही जेवढे देता येईल, तेवढे देण्याचा प्रयत्न करू. यात पर्यटन विकासाला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महायुती सरकारने आता कोकणच्या विकासाकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात कोकणच्या पर्यटन विकासासाठी महायुती सरकारने अधिक झुकते माप दिल्यास निश्चितच कोकणातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळून पर्यटन अधिक बहरू
शकते.
मालवण-राजकोट येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे मालवण राजकोट देशाच्या नकाशावर गेले आहे. राजकोट किल्ल्याच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला, मालवणमधीलच तारकर्ली पर्यटन स्थळ, स्वच्छ समुद्र किनारे आणि पर्यटकांसाठी गेल्या पाच-दहा वर्षांत निर्माण करण्यात आलेले स्कुबा डायव्हिंग, साहसी जलक्रीडा प्रकार अशा अनेक सुविधा असल्याने पर्यटकांचा ओघ कोकणात वाढू लागला आहे. आता तर पुन्हा शिवपुतळा उभारणीमुळे केवळ मालवणातच नव्हे, तर संपूर्ण कोकणात पर्यटन बहरणार आहे. सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून 100 कोटी रुपये खर्चून मालवण राजकोट येथे शिवसृष्टी उभारली जाणार आहे. याच शिवसृष्टीला मुख्यमंत्र्यांनीच उभारणीसाठी निधी दिला जाईल, असे जाहीर केल्यानेच शिवसृष्टीची संकल्पना पूर्णत्वास येऊन पर्यटक व शिवप्रेमींसाठी ती पर्वणी ठरणार आहे.
संदीप गावडे