बॉयलर स्फोटानंतर आता संतापाचा भडका
मृतांना योग्य भरपाई देण्याबरोबरच कुटुंबांना आधार देण्याची मागणी : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख रुपये भरपाई देण्याचे जाहीर
बेळगाव : मरकुंबी (ता. बैलहोंगल) येथील इनामदार शुगर्समध्ये बुधवारी दुपारी झालेल्या बॉयलर स्फोटात 8 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या आशा-आकांक्षांचीही राखरांगोळी झाली आहे. बळी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना कारखान्याने भरपाई जाहीर करावी, या मागणीसाठी गुरुवारी सायंकाळी बैलहोंगल येथे मृतदेह ठेवून नागरिकांनी निदर्शने केली. यावेळी कारखानदारांविरुद्ध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. या घटनेत 8 कामगारांचा बळी जाऊनही कारखान्यातील कोणीही कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले नाहीत. भरपाईही दिली नाही, असे सांगत मृतदेह ठेवून कुटुंबीय, नातेवाईक व अरवळ्ळी गावकऱ्यांनी धरणे धरले. मंजुनाथ काजगार (वय 28) हा तरुण अरवळ्ळीचा. थाटात लग्न करण्यासाठी मंजुनाथने साखर कारखान्यात नोकरी मिळविली होती. दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्यामुळे लग्नाचे स्वप्न अधुरेच राहिले, असे गावकऱ्यांनी सांगितले.
कारखान्यातील अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख रुपये भरपाई जाहीर केल्याचे सांगितले. तरुणाच्या मृत्युमुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. त्यांना सावरण्यासाठी किमान 50 लाख रुपये भरपाई द्यावी, बळी गेलेल्या कामगारांच्या पत्नींना सन्मानाने नोकरी द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी केली. कारखान्याचे संचालक आल्याशिवाय धरणे मागे घेणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. जखमी कामगारांना वाचविण्यासाठी झिरो ट्रॅफिकमधून त्यांना तातडीने बेळगावला हलविण्यात आले. मात्र सर्व 8 जणांचा बळी पडला. हुलीकट्टीचा युवक मंजुनाथ तेरदाळ हा अभियंता होता. त्याची पत्नी गर्भवती आहे. एक-दोन दिवसात प्रसूती होणार आहे. त्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. कोणाला लग्न करायचे होते तर आणखी कोणाला घर बांधायचे होते, कोणाला आपल्या कुटुंबीयांचा सांभाळ करायचा होता. त्यामुळेच हे सारे साखर कारखान्यात नोकरीवर होते. मुलांना गमावलेल्या कुटुंबीयांनी आपल्या दु:खाला आक्रोशातून गुरुवारी वाट करून दिली.
शवागाराबाहेरही कुटुंबीयांकडून धरणे...
उत्तरीय तपासणी सुरू असताना शवागाराबाहेरही कुटुंबीयांनी धरणे धरले होते. कारखान्याचे चालक किमान सांत्वन करण्यासाठीही आले नाहीत, असा आरोप करण्यात आला. जिल्हा प्रशासनानेही या घटनेसंबंधी अहवाल मागविला असून दुर्घटनेत बळी पडलेल्या कामगारांना कारखान्याबरोबरच सरकारनेही भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.