ऑगस्ट क्रांतीनंतर आता सप्टेंबर क्रांती?
हायकमांडने सत्तावाटपासंबंधी ठोस निर्णय घेतले नाही तर डी. के. शिवकुमार व त्यांचे समर्थक बंडाचा पवित्रा घेणार हे स्पष्ट आहे. जर शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचे ठरले तर सिद्धरामय्या समर्थकही काही निवांत बसणार नाहीत. एकंदर हायकमांडचा निर्णय काही असला तरी कर्नाटकात संघर्ष हा होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच के. एन. राजण्णा यांनी सप्टेंबरमध्ये क्रांती होणार, असे भाकित वर्तवले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कर्नाटकात हृदयाघाताची प्रकरणे वाढतीच आहेत. नागरी समाजाला असलेला धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनेही ही प्रकरणे गांभीर्याने घेतली आहेत. हृदयाघाताची कारणे शोधण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञ समितीने अहवाल दिल्यानंतर सरकारने काही ठोस निर्णय जाहीर केले आहेत. 18 वर्षांखालील मुलांची दरवर्षी शाळेत तपासणी करणे, पाठ्यापुस्तकात हृदयआरोग्याविषयक धड्याचा समावेश करणे, हृदयस्तंबनाने होणाऱ्या मृत्यू प्रकरणात त्याची कारणे जाणून घेण्यासाठी अशा प्रकरणात पोस्ट मॉर्टेम सक्तीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हासन जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हृदयाघाताची प्रकरणे दिसून आली होती. हासनपाठोपाठ राज्यातील इतर जिल्ह्यातही हृदयाघाताने होणारे मृत्यू वाढले आहेत. शाळकरी मुले, तरुण हृदयाघाताचे बळी ठरत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
सध्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोन्ही नेते दिल्लीत आहेत. हायकमांडची भेट घेऊन नेतृत्व बदलाच्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सहकारमंत्री के. एन. राजण्णा हे गेल्या पंधरा दिवसांपासून कर्नाटकाच्या राजकारणात सप्टेंबरमध्ये क्रांती होणार, असे सांगू लागले आहेत. ही क्रांती नेमकी कशी असणार, त्याचा फटका कोणाला बसणार, याची वाच्यता त्यांनी केली नाही. सर्व काही आधीच जाहीर केले तर तुम्हाला त्याची उत्सुकता राहणार नाही. सप्टेंबरपर्यंत वाट पहा, काय होतेय ते बघा, असे उघडपणे सांगितले आहे. आधीच नेतृत्वबदलाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष सुरू आहे. लवकरच शिवकुमार मुख्यमंत्री होणार, असे त्यांचे समर्थक नेते आमदार उघडपणे सांगू लागले आहेत. तर मुख्यमंत्रीपद सध्या रिक्त नाही. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच कोठे येतो? असा प्रश्न मुख्यमंत्री समर्थकांनी उपस्थित केला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष सुरू असतानाच राजण्णा यांनी सप्टेंबर क्रांतीचे भविष्य कथन केले आहे.
आमदारांमधील वाढता असंतोष लक्षात घेऊन पक्षाचे कर्नाटकाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी दोन टप्प्यात तब्बल सहा दिवस काँग्रेस आमदारांना भेटून त्यांचे गाऱ्हाणे ऐकले आहे. कर्नाटकात नेमके काय चालले आहे? याचा अहवाल ते हायकमांडला देणार आहेत. त्यांचा अहवाल पोहोचण्याआधीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीला पोहोचले आहेत. गुरुवारी सायंकाळी हे दोन्ही नेते पक्षाच्या वरिष्ठांना भेटणार आहेत. आपल्या नेत्यांना भेटण्याआधीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नेतृत्व बदलाच्या चर्चेला पूर्णविराम देतानाच मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असलेले डी. के. शिवकुमार यांनाही अप्रत्यक्षपणे शह देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकात नेतृत्व बदलाचा प्रश्नच येत नाही. सत्तावाटप ठरले नाही, तशी चर्चाही झाली नाही. डी. के. शिवकुमार यांनी अशी मागणीही केली नाही. असे सांगतानाच हायकमांडलाही पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री पदावर राहणार, असा संदेश त्यांनी दिला आहे. नवी दिल्लीत असतानाच मुख्यमंत्र्यांनी हा संदेश दिला आहे. पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री पदावर राहणार हे सांगतानाच हायकमांडचा निर्णय आपल्याला मानावा लागणार, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
आजवर केवळ या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये कलगीतुरा सुरू होता. या चर्चेत स्वत: मुख्यमंत्र्यांनीच आता उडी घेतली आहे. वीरशैव लिंगायत गुरुपरंपरेतील पंचपीठांपैकी एक पीठ असलेल्या रंभापुरी जगद्गुरुंनी डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी आशा व्यक्त केली आहे. त्यापाठोपाठ शिवकुमार ज्या नोनविनकेरे मठाधीशांना मानतात त्या स्वामीजींनीही पुढचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार असतील, असे भविष्य वर्तवले आहे. एकीकडे काँग्रेस नेते व आमदारांमध्ये पुढचे मुख्यमंत्री कोण, या मुद्द्यावर उघडपणे चर्चा रंगली असतानाच काही धर्माचार्यांनी मात्र शिवकुमार यांना आशीर्वाद दिला आहे. खरेतर रंभापुरी जगद्गुरुंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री पदासाठीच्या चर्चेने उचल खाल्ली. कर्नाटकाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनीही कर्नाटकात सध्या नेतृत्व बदलाचा विचार नाही. सहा दिवस आपण आमदारांना भेटून त्यांचे गाऱ्हाणे ऐकले आहे. त्यांनी त्यांच्या समस्या आपल्यासमोर मांडल्या आहेत. या काळात नेतृत्व बदलाविषयी चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले असले तरी डी. के. शिवकुमार समर्थकांची आक्रमक भूमिका लक्षात घेता सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू आहेत, हे लक्षात येते.
कर्नाटकात सत्ता स्थापन करताना सत्तावाटपाची सूत्रे ठरवण्यात आली होती. अडीच वर्षे सिद्धरामय्या, पुढील अडीच वर्षे शिवकुमार असे सूत्र ठरले असेल तर याबद्दल हायकमांडने आजवर कसलीच वाच्यता केली नाही. डी. के. शिवकुमार यांनी यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सत्तावाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र कसलेच सत्तावाटप होणार नाही. पुढील पाच वर्षे आपण मुख्यमंत्री राहणार आहे, असे ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री समर्थक खुश आहेत.
गुरुवारच्या बैठकीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळणार, कर्नाटकातील सत्तासंघर्ष थांबणार, अशी अपेक्षा करणेही चुकीचे आहे. कारण हायकमांडने सत्तावाटपासंबंधी ठोस निर्णय घेतले नाही तर डी. के. शिवकुमार व त्यांचे समर्थक बंडाचा पवित्रा घेणार हे स्पष्ट आहे. जर शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचे ठरले तर सिद्धरामय्या समर्थकही काही निवांत बसणार नाहीत. एकंदर हायकमांडचा निर्णय काही असला तरी कर्नाटकात संघर्ष हा होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच के. एन. राजण्णा यांनी सप्टेंबरमध्ये क्रांती होणार, असे भाकित वर्तवले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.