फेरतपासणीनंतर राज्याची मतदारसंख्या 10,57,566 1.27 लाख नावे वगळली
पुढील दीड महिन्यात होणार अंतिम यादी
प्रतिनिधी/ पणजी
विशेष मोहिमेंतर्गत राज्यातील मतदारांच्या घेण्यात आलेल्या फेरतपासणी प्रक्रियेंतर्गत आता 10,57,566 ग्राह्य मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान मतदारयादीतून एकूण 1,27,121 मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर वरील संख्येएवढे मतदार शिल्लक राहिले आहेत. तथापि वगळण्यात आलेल्या नावांसंबंधी काही चूक, आक्षेप असल्यास येत्या 15 दिवसांच्या आत आपल्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली.
शनिवारी पणजीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गतवर्षी दि. 27 ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. त्यावेळी राज्याची मतदारसंख्या 11,85,034 एवढी होती. त्यासंबंधी दोन महिन्यांनंतर दि. 16 डिसेंबर रोजी मसुदा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात एकूण 1 लाख 42 नावे वगळण्यात आली. ही नावे मृत, अनुपस्थित, बदललेला पत्ता किंवा दुहेरी नाव असलेल्या मतदारांची होती. त्यानंतर सदर यादीत एकूण 10,84,992 मतदार शिल्लक राहिले होते. त्यामध्ये 5,23,304 पुऊष तर 5,61,679 महिला आणि 9 तृतीयपंथी अशा मतदारांचा समावेश होता. या सर्वांना नोटिसा पाठवून सुनावणी घेण्यात आली होती. त्याशिवाय, 58,923 मतदारांच्या माहितीत तफावत आढळल्याने त्यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या व त्यामधून 38,780 जणांना अपात्र ठरवण्यात आले. अशाप्रकारे मसुदा यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची एकूण संख्या 27,426 इतकी आहे, असे गोयल यांनी सांगितले.
मसुदा यादीनंतर आता तयार करण्यात आलेल्या अंतिम यादीनुसार राज्याची मतदारसंख्या 5,11,436 पुऊष आणि 5,46,121 महिला तसेच 9 तृतीयपंथीय यांच्यासह एकूण 10,57,566 एवढी आहे. त्यात 18-19 वर्षीय मतदारांचे प्रमाण 3.41 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरीही या अंतिम यादीला मूर्तरूप देण्यापूर्वी मतदारांना आणखी एक संधी म्हणून आक्षेप नोंदविण्यासाठी वाढीव 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आक्षेप नोंदवता येतील व त्यातही समाधान न झाल्यास त्यापुढील 30 दिवसात थेट मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे आक्षेप नोंदवता येतील असे गोयल यांनी सांगितले.
मसुदा यादीत सापडले 428 पोर्तुगीज पारपत्रधारक
दरम्यान, राज्यात पोर्तुगीज पारपत्रधारकांची संख्याही लक्षणीय असून गृह मंत्रालय, पारपत्र कार्यालय आणि एफआरआरओ यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार ती संख्या सुमारे 16,721 आहे. तरीही त्यामधील 428 नावे मसुदा यादीत आली होती. त्यातील 420 नावे वगळण्यात आली. उर्वरित लवकरच वगळण्यात येणार आहेत.
या दरम्यान, गोयल यांनी कालच राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मतदारसंघ व बुथस्तरावर वगळण्यात आलेल्या नावांची अंतिम यादी सुपूर्द केली. त्यानुसार आता त्यांच्याकडूनही सूचना, आक्षेप येण्याची शक्यता आहे. सदर यादी ‘सीईओ गोवा’च्या संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याची माहिती गोयल यांनी दिली.
राज्यस्तरीय निवडणुकांचा निर्णय हा स्थानिक आयोगाचा अधिकार
या दरम्यान, राज्यात लवकरच अनेक पालिकांच्या निवडणुका होणार आहेत तर फोंडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यावेळी नूतन यादीनुसार मतदान होईल की जुन्याच यादीचा समावेश असेल, असे विचारता, तो निर्णय पूर्णत: राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रातील असल्याचे गोयल म्हणाले. पणजी मनपाची तर निवडणूक जाहीर होऊन उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रियाही जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर गोयल यांना सदर प्रश्न विचारण्यात आला होता.
जिल्हाधिकाऱ्यांकडून राजकीय प्रतिनिधींना मार्गदर्शन
सांताक्रूज राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार फेरतपासणीच्या अंतिम यादीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उत्तर गोवा जिल्हा निवडणूक अधिकारी अंकित यादव यांनी राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन अंतिम मतदार यादीची प्रत सुपूर्द केली.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यांना माहिती देताना विशेष फेरतपासणीची अंतिम मतदार यादी तयार करण्यात आल्याचे सांगितले. या यादीचे दि. 21 फेब्रुवारी रोजीच प्रकाशन करण्यात आले आहे. त्यानुसार उत्तर गोव्यात एकूण मतदारांची संख्या 4,98,284 एवढी असून त्यात 2,41,948 पुऊष आणि 2,56,336 महिला मतदार असल्याचे त्यांनी सांगितले.
असे असले तरीही ईआरओच्या निर्णयामुळे एखादा पक्ष किंवा मतदार नाराज असतील तर ते प्रथम जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे आणि तरीही गरज भासल्यास थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अपिल करू शकतील, अशी माहिती त्यांनी दिली.