महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पात्र-अपात्रतेनंतर

06:55 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्रात जो सत्तासंघर्ष सुरु आहे त्यातील पात्र-अपात्रतेचा निकाल लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सोळा आणि ठाकरे गटाचे चौदा आमदार पात्र ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी हे शिक्कामोर्तब केले. या निकालानंतर आणि त्याआधी नार्वेकर यांच्यावर आरोपांची जी चिखलफेक झाली ती खेदकारक आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे, संजय राऊत व आदित्य ठाकरे यांच्यावर हक्कभंग आणणार अशी घोषणा मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली आहे. याच जोडीला अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असे ठाकरे गटाने म्हटले आहे. या लढाईत भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांनी थेट प्रतिक्रिया दिलेली नाही किंबहुना ते जाणीवपूर्वक दूर राहिले. आता या निकालावर सर्वोच्च न्यायालयात तारखा सुरु होतील. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट झाली त्याचाही निकाल नार्वेकर करतील आणि मुख्यमंत्री व त्यांचा शिवसेना गट नव्या उत्साहाने राज्याचा कारभार आणि लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरेल हे वेगळे सांगायला नको. वरवर हे सारे सरळ, साधे, सोपे वाटत असले तरी ते तसे नाही. नार्वेकर यांच्याकडून हाच निकाल अपेक्षित होता आणि या निकालानंतर त्याला विरोध कसा करायचा यांची रणनिती ठरवण्यात आली होती. भाजपा-शिवसेना ही पंचवीस वर्षाची युती तोडून वेगळा निर्णय घेतला तेव्हापासून सुरु झालेला संघर्ष, अनिश्चितता आणि राजकारणाचे अवमूल्यन थांबायला तयार नाही. जनतेने भाजपा-शिवसेना युतीला कौल दिला होता व काँग्रेस-राष्ट्रवादीवर विरोधक म्हणून जबाबदारी सोपवली होती. पण युती फोडली तर जमते हे लक्षात घेऊन शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांनी जनादेश डावलत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवत नवी आघाडी केली आणि भाजपला विरोधी बाकावर बसवले. सर्वात जास्त संख्येने आमदार असलेला भाजपा विरोधी बाकावर आणि तुलनेने दोन अंकी आमदार असलेली आघाडी सत्तेवर यामुळे संघर्ष तापला त्यातच कोरोना संकट आले. उद्धव ठाकरे मंत्रालयातही जात नव्हते आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता राबवत होती याचा शिवसेनेला फटका बसला व शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उठाव झाला व राज्यात सत्ताबदल झाला. त्यातून रोजच आरोप, खोकी, डोकी, पत्राचाळ, इडी, कोरोना काळातील घोटाळे अशी चिखलफेक होत राहिली व राजकीय पक्षात कमालीचा संघर्ष सुरु झाला. राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना असे चार तुकडे पडलेले होते. नव्या संघर्षानंतर त्यात आणखी दोन म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी भर पडली. विकासाचे, प्रगतीचे, स्थैर्याचे राजकारण हवे तर कोणत्याही एका पक्षाला पुरेसे संख्याबळ गरजेचे असते. अन्यथा सर्वांना दादा-बाबा करताना काहीचे हितसंबंध जोपासले जातात आणि राज्यहिताकडे, लोकहिताकडे दुर्लक्ष होते. महाराष्ट्रात तेच होत आहे. गेल्या निवडणुकीत चार तुकडे पडले होते. आगामी निवडणुकीत सहा तुकडे पडतील असे स्पष्ट दिसते आहे. निवडणूकपूर्व युती अथवा आघाडी झाली असली आणि जागावाटप झाले वा होणार असले तरी निवडणुकीनंतर सोयीची भूमिका अर्थात सत्तेचा वाटा घेतला जातो. यासाठी लोकांनीच योग्य दक्षता घेतली पाहिजे आणि सहा तुकड्यातून एका पक्षाला पुरेसे संख्याबळ दिले पाहिजे. पात्र-अपात्र याचा फैसला झाला आता मंत्रीमंडळ विस्तार आणि लोकसभेची रणनिती असे वरवर भासवले जात असले तरी प्रत्यक्षात या सर्वाला अनेक कंगोरे आहेत. प्रत्येकाचे हितसंबंध आहेत. जाती-पातीचे राजकारण आहे आणि विविध प्रश्नांचे ताणतणाव आहेत. यासर्व गोष्टीचे सुतोवाच झाले आहे. मकरसंक्रांतीनंतर त्यास गती येईल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन विदेशीच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केली होती पण नंतर मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधत सोनिया गांधींना तिळगूळ देत काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. यंदाही मकरसंक्रांत अनेक हालचाली निर्णायक पातळीवर आणेल असे दिसत आहे. दिल्लीत जागा वाटप आणि इंडिया आघाडीला महाराष्ट्रातून खतपाणी लाभलेले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आदी मंडळी ते काम करत आहेत. मकरसंक्रांती दरम्यान या संदर्भात मोठी अपडेट अपेक्षित आहे. त्याच जोडीला आरक्षण व त्यासाठीचे आंदोलन यांचे केंद्रस्थान मुंबई होईल असे दिसते आहे. तीन लाख मराठे मुंबईत येतील असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे तर ओबीसी आपली ताकद दाखवतील, असेही जाहीर झाले आहे. संक्रांतीनंतर हा संघर्ष होणार असे दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक व मुंबई दौरा करुन रोड शो व रामपूजा करुन दिल्लीत परततील तेव्हा संघ आणि विश्वहिंदू परिषद यांनी देशभर उठवलेली श्रीराम मंदिर लाट तीव्र झालेली असेल. मंदिर लोकार्पण आणि रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा न भूतो न भविष्यती असा करण्यावर भर देण्यात आला आहे. लहान-मोठे अनेक कार्यक्रम अनेक पातळीवर सुरु आहेत. निमंत्रणाच्या अक्षता घरोघरी दिल्या जात आहेत. अयोध्या नगरी सजली आहे. या सगळयाचे परिणाम संक्रातीनंतर दिसायला लागतील. काँग्रेसने राममंदिर लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. त्याचेही राजकारण होईल. त्यामुळे पुढील काही दिवस संक्रमणाचे, संघर्षाचे असतील हे वेगळे सांगायला नको. महाराष्ट्रात पात्र-अपात्र वाद सुरु राहणार असला तरी राहूल नार्वेकर यांच्या निकालानंतर मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटातून भरत गोगावले, संजय शिरसाट, अपक्ष व नाराज बच्चू कडू, भाजपाकडून संजय कुटे, माधुरी मिसाळ, देवयानी फरादे, योगेश सागर यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवारही आपल्या सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात निदान महामंडळावर स्थान देण्याची मागणी करतील हे स्पष्ट आहे. पात्र-अपात्र संघर्षातून लांबलेला मंत्रीमंडळ विस्तार आता शक्य आहे. लोकसभा निवडणूक जिंकून पाठोपाठ विधानसभा व अन्य निवडणुका पदरात पाडून घ्यायच्या व डबल इंजिन राखायचे असे मनसुबे आहेत. तूर्त अपात्रतेची टांगती तलवार दूर झाली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article