राष्ट्रवादीनंतर आता दोन्ही शिवसेना ऐक्याची चर्चा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधानपरिषदेसाठी होणाऱ्या निवडणूकीत 17 जागांपैकी 14 जागांवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजपने त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांची अवघ्या 6 जागांवर बोळवण केली, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजी नाट्या बघायला मिळत आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांतील उमेदवारांना सोबत घेऊन भाजपने राज्यातील प्रत्येक भागात आपली स्वत:ची ताकद वाढवली आहे. महायुतीत निवडणूक लढताना भाजपशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक जिंकणे अवघड आहे. त्यातच या दोन्ही पक्षांना भाजपच्या ओंजळीने पाणी प्यायला लागत आहे.
शिवसेनेचे ऐक्य असताना बाळासाहेब ठाकरेंपासून ज्या जागा शिवसेनेकडे होत्या त्या देखील शिवसेनेला मिळाल्या नाहीत. त्यामुळे नाराज असलेल्या शिवसेना नेत्यांनी आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज असल्याचे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप शिवसेनेचे मुंडके उडवत असल्याचे वक्तव्य केले असून, दानवेंच्या शिवसेना ऐक्याच्या मागणीचे समर्थन केले आहे.
विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीला आता इतके महत्त्व आले आहे की, या उमेदवारांची घोषणा देखील शेवटच्या क्षणी करायला लागली. पूर्वी या निवडणूकीसाठी उमेदवारांची घोषणा ही चार पाच दिवस आधी केली जायची, त्यावेळी भाजपचा निर्णय भाजपचे राज्यातील नेते घ्यायचे, राष्ट्रवादीचा शरद पवार आणि अजित पवार आणि शिवसेनेचा मातोश्रीवऊन, फक्त काँग्रेसचा दिल्लीतून व्हायचा. मात्र आता शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवाद (अजित पवार पक्ष) यांचा पण निर्णय दिल्लीतून होतो, म्हणून गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीत मुक्काम करावा लागला. शिंदे यांनी अमित शाहांची स्वतंत्र भेट घेऊन देखील त्यांना केवळ चारच जागा मिळाल्या. या 17 जागांचा विचार करता त्यातील 14 जागांवर भाजपचे वर्चस्व असल्याने महायुतीतील भाजपसोबत असलेल्या दोन्ही पक्षांची चांगलीच कोंडी झाल्याचे बघायला मिळत आहे.
भाजपने राज्यातील राजकारणाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली असल्याचे या विधानपरिषदेच्या निवडणूकीत दिसत आहे. उध्दव ठाकरेंच्या काळात शिवसेना एकसंध असताना ज्या शिवसेनेकडे पाच जागा होत्या. त्या देखील भाजपला मिळाल्या नाहीत, छत्रपती संभाजी नगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आता तो भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून छत्रपती संभाजीनगरमधील महापालिका, जिल्हापरिषद तसेच खासदार आणि आमदार हे शिवसेनेचे होते. मात्र पक्षाचे विभाजन झाल्यानंतर येथील शिवसेनेचे वर्चस्व भाजपने संपवल्याचा आरोप शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांकडून होऊ लागली आहे, माझं ते माझं आणि तुझं ते पण माझे ही भाजपची वृत्ती असल्याने भाजप सगळीकडे आमचीच ताकद जास्त असल्याचे सांगत आहे. पण ज्या शिवसेनेची ताकद कोकणात जास्त आहे, ती जागा राष्ट्रवादीला तर ज्या परभणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे, तिथली जागा शिवसेनेला सोडली जाते. प्रादेशिक पक्षांचे विभाजन करायचे, जेव्हा गरज लागेल तेव्हा एकाला जवळ करायचे, एकाला दूर सारायचे हीच भाजपची रणनिती पहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेत भाजपसोबत शिवसेना सत्तेत आहे, मात्र इथेदेखील भाजप आणि शिवसेनेत समन्वय नाही.
मान्सूनपूर्व नालेसफाई तसेच इतर कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर आणि उपमहापौरांचा स्वतंत्र दौरा होणे यावऊन महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. भाजपने ज्या 11 जागांवर उमेदवारांची घोषणा केली, त्या जागेवर इच्छुक असणाऱ्याला उमेदवारी मिळाली नाही. त्यातील कोणीही आपली नाराजी व्यक्त केली नाही, पुण्यात राष्ट्रवादीने विक्रम काकडेंची उमेदवारी घोषणा केल्यानंतर नाराजी नाट्या पहायला मिळाले. तिकडे यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्याविरोधात भाजपकडून नितीन भुताडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर संभाजीनगर-जालनामधून भाजपने संजय शिरसाट यांना उमेदवारी दिली. शिरसाटांच्या विरोधात शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भविष्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेते सत्तापदे मिळविण्यासाठी भाजपात का जाणार नाही, कारण ज्या प्राजक्त तनपुरेंनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे रविवारी दिल्लीतून उमेदवारांच्या यादीत नाव आले, आयातांना भाजपने संधी दिल्याने भाजपमधील केशव-माधव निष्ठावंतांच्या संयमाची पुन्हा एकदा परीक्षा भाजपने घेतली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या वेळी अमरावतीच्या तत्कालीन खासदार नवनीत राणा यांनी स्वत:च्याच युवा स्वाभिमान पक्षाच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. नंतर दुसऱ्याच दिवशी भाजप उमेदवारांच्या यादीत राणांचे नाव आले. पुण्यातील उमेदवार विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या विधानपरिषदांच्या निवडणूका आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत? असा प्रश्न सोमवारी झालेल्या राजकीय घडामोडी बघता पडतो. राष्ट्रवादीला भाजपने पुण्याची जागा सोडली मात्र ही जागा सोडताना उमेदवार हा भाजपने दिला असण्याची शक्यता आहे. जसे मुंबईत विधानसभा निवडणूकीत भाजपचे शायना एनसी, मुरजी पटेल हे शिवसेनेचे उमेदवार होते. पक्षाकडे आता दादांसारखा खमका नेता नाही, त्यात तटकरे, पटेल यांच्यावर पक्षाने दाखविलेला अविश्वास आणि दादांसोबतच्या ज्येष्ठांना दूर ठेवण्याचे केले जाणारे प्रयत्न यामुळे राष्ट्रवादी फुटण्यास वेळ लागणार नाही. त्यात भाजपची भूमिका ही जशी छोट्या राज्यांची आहे, तशी राजकीय पक्षांमध्ये छोट्या गटांच्या निर्मितीची पण राहिली आहे. देशात भाजपविरोधी वातावरण तयार होत आहे, जसा पावसाचा अंदाज पावश्या पक्षाला आधीच येतो, त्यानुसार संकेत देतो, त्याप्रमाणे देशात विरोधी वातावरण तयार होत असेल तर राजकारण्यांना याचे आधीच संकेत मिळतात. त्यामुळे भाजपच्या विरोधात राज्यात एकवटण्यासाठी तर दोन्ही शिवसेनेकडून ऐक्याची चर्चा नाही ना असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रवीण काळे