मारुती- टाटानंतर एमजी देखील किंमती वाढविणार
इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे कंपनीचा निर्णय : 1 जानेवारीपासून लागू होणार नव्या किंमती
नवी दिल्ली :
मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सनंतर एमजी मोटर इंडियानेही आज किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी-2024 पासून त्याच्या लाइन-अपमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व वाहनांच्या किमतींमध्ये वाढ होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये वाढती महागाई आणि वस्तूंच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
नवीन किमती 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील. एमजीने किमतीच्या वाढीच्या प्रमाणाची पुष्टी केलेली नाही, परंतु मॉडेलच्या आधारावर किमती वाढवल्या जातील अशी माहिती दिली आहे. कंपनीने नुकतीच हेक्टरच्या किमतीत 40,000 रुपयांनी वाढ करून एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 15 लाख रुपये केली आहे. याआधी सप्टेंबरमध्ये एमजीने हेक्टरच्या किमतीत कपात केली होती, मात्र ती लवकरच वाढवण्यात आली.
एमजीने गेल्या महिन्यात 4,154 कार विकल्या
एमजी इंडियाच्या लाइनअपमध्ये सध्या कॉमेट ईव्ही, हेक्टर, हेक्टर प्लस, एस्टर, ग्लोस्टर आणि ऑल-इलेक्ट्रिक झेडएस ईव्ही समाविष्ट आहेत. नोव्हेंबर महिन्यात कंपनीने विक्रीच्या बाबतीत वार्षिक 1.8 टक्केची वाढ केली आहे. या कालावधीत एमजीने 4,154 युनिट्सची विक्री केली. गेल्या महिन्यात कार निर्मात्याच्या एकूण विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 30 टक्के होती.
एमजी मोटरच्या मालकीची कंपनी एसएआयसी मोटारने जेएसडब्लू स्टील (जिंदाल साउथ वेस्ट) सोबत भागीदारी करून भारतात एमजीच्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी लंडनमधील एमजी कार्यालयात एसएआयसी संचालक वांग शिओक्यु आणि जेएसडब्लू समूहाचे पार्थ जिंदाल यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.