‘महादेव’नंतर आता ऑपरेशन शिवशक्ती
पूंछ येथे नियंत्रण रेषेजवळ चकमकीत दोन दहशतवादी ठार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील पूंछ येथे नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने खात्मा केला. मंगळवारी रात्री उशिरा सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना देववार सेक्टरच्या मालदीवेलन भागात संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर ही चकमक सुरू झाली. या मोहिमेला ‘शिवशक्ती’ असे नाव देण्यात आले. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला. दोनच दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये राबविण्यात आलेल्या ‘महादेव’ मोहिमेनंतरचे ‘शिवशक्ती’ हे दुसरे मोठे ‘ऑपरेशन’ ठरले आहे.
पूंछ सेक्टरच्या जनरल भागात कुंपणाजवळ सैनिकांनी दोन संशयितांच्या हालचाली दिसून आल्या. त्यानंतर सीमेपलीकडून भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला लष्कराच्या जवानांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर चकमक सुरू झाली. मंगळवारी रात्री उशिरा देववार सेक्टरच्या मालदीवेलान भागात जोरदार गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना गोळ्या घालण्यात आल्या. हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती.
अलिकडच्या काळात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन दिवसात लष्कराची ही दुसरी चकमक आहे. 28 जुलै रोजी श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन भागात सुरक्षा दलांनी तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. गृहमंत्री अमित शहा यांनी 29 जुलै रोजी लोकसभेत यासंबंधी माहिती देताना पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी सुलेमान याच्यासह जिब्रान आणि हमजा अफगाणी यांना ठार केल्याचे स्पष्ट केले. 2024 च्या सोनमर्ग बोगदा प्रकल्पावरील हल्ल्यात जिब्रानचा सहभाग होता. दहशतवाद्यांकडून अमेरिकन एम4 कार्बाइन, एके-47, 17 रायफल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. त्याला ‘ऑपरेशन महादेव’ असे नाव देण्यात आले होते.