For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञानवापीनंतर आता धार भोजशाळेचे सर्वेक्षण

06:22 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानवापीनंतर आता  धार भोजशाळेचे सर्वेक्षण
Advertisement

उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाचा आदेश : अहवालासाठी सहा आठवड्यांची मुदत

Advertisement

वृत्तसंस्था/ इंदूर

ज्ञानवापीच्या धर्तीवर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने धार भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी या मुद्द्यावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणला (एएसआय) पाच तज्ञांची टीम तयार करण्यास सांगितले आहे. या पथकाला सहा आठवड्यांत अहवाल तयार करून सादर करावा लागणार आहे. उच्च न्यायालयाने संपूर्ण सर्वेक्षणाचे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करण्यास सांगितले आहे. हे वैज्ञानिक सर्वेक्षण जीपीआर-जीपीएस पद्धतीने करण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Advertisement

या प्रकरणाबाबत अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आदेशाच्या प्रतीसह ‘मध्य प्रदेशातील भोजशाळा/धारच्या एएसआय सर्वेक्षणाच्या आपल्या विनंतीला इंदूर उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे...’ असे म्हटले आहे. हिंदू पक्षाने धार भोजशाळेची पुरातत्व सर्वेक्षण करण्याची मागणी होती. यावर इंदूर उच्च न्यायालयाने सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवला होता, हिंदू पक्षानेही येथे होणाऱ्या नमाजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ‘एएसआय’द्वारे संरक्षित केलेले स्मारक असून त्याला राजा भोजचे नाव देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

भोजशाळा वाद नेमका काय?

धारची भोजशाळा राजा भोजने बांधली होती. जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटनुसार, हे एक विद्यापीठ होते, ज्यामध्ये वाग्देवीची मूर्ती बसवण्यात आली होती. मुस्लीम शासकाने त्याचे मशिदीत रुपांतर केले होते. त्याचे अवशेष प्रसिद्ध मौलाना कमालउद्दीन मशिदीतही पाहायला मिळतात. ही मशीद भोजशाळेच्या परिसरातच आहे, तर देवीची मूर्ती लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.

हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पक्षांना परवानगी

शुक्रवारी मुस्लीम समाजाला दुपारी 1 ते 3 या वेळेत नमाज अदा करण्यासाठी भोजशाळेत प्रवेश दिला जातो. तर मंगळवारी हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी आहे. दोन्ही पक्षांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. इतर दिवशी तिकिटाची किंमत एक ऊपया असते. याशिवाय, वसंत पंचमीला सरस्वती पूजेसाठी, हिंदू बाजूने दिवसभर पूजा आणि हवन करण्याची परवानगी आहे.

हिंदू फ्रंट फॉर जस्टिसने 1 मे 2022 रोजी इंदूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. भोजशाळेचे संपूर्ण नियंत्रण हिंदूंच्या हाती द्यावे, असे सांगण्यात आले. दर मंगळवारी हिंदू भोजशाळेत यज्ञ करून शुद्धीकरण करतात आणि शुक्रवारी मुस्लीम नमाजाच्या नावाने यज्ञकुंड अपवित्र करतात, हे थांबवले पाहिजे. यासोबतच भोजशाळेचे छायाचित्रण, व्हिडिओग्राफी आणि उत्खनन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. या मुद्द्यांच्या आधारे सर्वेक्षण करण्याची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. त्याचा पाहणी अहवाल 6 आठवड्यात उच्च न्यायालयात सादर केला जाईल. या सर्वेक्षणात आजूबाजूच्या 50 मीटर त्रिज्याही तपासल्या जाणार आहेत.

भोजशाळेमध्ये 2006, 2012 आणि 2016 मध्ये शुक्रवारी वसंत पंचमी आली तेव्हा वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. वसंत पंचमीला शुक्रवार असताना हिंदूंना पूजा करण्याची परवानगी असतानाच मुस्लिमांचीही नमाज अदा करण्यासाठी  रांग लागल्यानंतर गोंधळ उडाला होता.

Advertisement
Tags :

.