For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंदूरनंतर गुजरातमध्ये दूषित पाण्याने हाहाकार

06:12 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंदूरनंतर गुजरातमध्ये  दूषित पाण्याने हाहाकार
Advertisement

शेकडो लोक रुग्णालयामध्ये दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/ गांधीनगर

दूषित पाण्यामुळे झालेल्या कहरामुळे मध्य प्रदेशातील इंदूरची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता गुजरातमध्येही धोक्याने दार ठोठावले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये अचानक टायफॉइडचा प्रादुर्भाव झाल्याने प्रशासनात घबराट पसरली आहे. रुग्णालये रुग्णांनी भरली असून 100 हून अधिक लोक जीव मुठीत धरून विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की प्रशासनाने पाणा उकळून पिण्याचा सल्ला जारी केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Advertisement

गेल्या तीन दिवसांत गांधीनगरमध्ये टायफॉईड आजाराने गंभीर वळण घेतले शनिवारपर्यंत 104 संशयित रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या मुलांची आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीता पारीख यांनी याबाबतच्या वृत्ताला दुजोरा देताना गांधीनगरच्या सेक्टर 24, 25, 26 आणि 28 तसेच आदिवाडा परिसरातील लोक दूषित पाण्याने बाधित झाल्याचे स्पष्ट केले. या भागातील पाण्याचे नमुने तपासले असता पिण्याचे पाणी पूर्णपणे असुरक्षित असल्याचे आढळून आले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांचे बारकाईने लक्ष

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. अमित शाह यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी तीन वेळा फोनवरून परिस्थितीचा आढावा घेतल्याचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले. तसेच संघवी यांनी स्वत: रुग्णालयाला भेट देत रुग्णांवर उपचार करण्यासाठी 22 डॉक्टरांची विशेष टीम तैनात केली आहे. उपचारांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी दाखल रुग्णांच्या कुटुंबियांसाठी जेवण आणि इतर सुविधांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. प्रशासन सतत देखरेख व्यवस्था मजबूत करत आहे.

Advertisement
Tags :

.