इंडिगो पाठोपाठ आता स्टार एअरचीही बेळगाव-मुंबई विमानसेवा
खासदार जगदीश शेट्टर यांच्या पाठपुराव्याला यश
बेळगाव : इंडिगो पाठोपाठ स्टार एअरनेही 29 मार्चपासून बेळगाव-मुंबई विमानसेवेसाठी बुकिंग केले आहे. मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली विमानसेवा स्टार एअरने पुन्हा सुरू केली आहे. याबाबत विमानतळ प्राधिकारणाकडे अधिकृत माहिती नसली तरी स्टार एअरने आपल्या वेबसाईटवरून बुकिंग सुरू केले आहे. सकाळी 7.20 वा. बेळगावहून मुंबईच्या दिशेने विमान रवाना होणार असून सकाळी 8.25 वा. मुंबई येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात सायंकाळी 7.40 वा. मुंबई येथून निघालेले विमान रात्री 8.45 वा. बेळगावला पोहोचणार आहे. बुकिंग वेबसाईटच्या आधारे ही विमानसेवा दररोज दिली जाणार आहे.
त्यामुळे सध्यातरी बेळगावमधील प्रवाशांना इंडिगो व स्टार एअर अशा दोन विमानसेवा मुंबई शहरासाठी उपलब्ध होणार आहेत. मध्यंतरी बेळगावहून मुंबईला जाणारी विमानसेवा बंद झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. स्टार एअरने अचानक ही विमानसेवा थांबविली होती. त्याबद्दल व्यापारी व उद्योजकांनी संताप व्यक्त केल्यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांनी स्टार एअरचे संचालक संजय घोडावत यांच्याशी फोनवरून संवाद साधत विमानसेवा सुरळीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार इंडिगोने 29 मार्चपासून बेळगाव ते नवी मुंबई या दरम्यान विमानफेरी सुरू केली आहे. स्टार एअरने शुक्रवारी दुपारपासून बेळगाव-मुंबई विमानफेरीसाठी बुकिंग सुरू केले आहे. त्यामुळे जयपूर व अहमदाबादबरोबरच आता बेळगाव-मुंबई ही विमानसेवाही सुरू होणार आहे.