वास्कोतील गोविंद मांजरेकर नंतर सूरज नाईकही गजाआड
नवेवाडेतील साक्षीला घातला साडेचार लाखांचा गंडा
वास्को : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून वास्कोतील एका महिलेला 4 लाख 30 हजारांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात वास्को पोलिसांनी काल सोमवारी या प्रकरणातील दुसऱ्या संशयित आरोपीलाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सूरज नाईक असे असून तो मूळ बायणातील आहे. रविवारी अटक करण्यात आलेल्या गोविंद मांजरेकर याला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. नवेवाडे वास्कोतील साक्षी सुदर्शन केरकर या महिलेने गोविंद व सूरज या बायणातील व्यक्तींकडे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्यासाठी दीड वर्षापूर्वी आर्थिक व्यवहार केला होता. मात्र, त्या दोघांनी नोकरीचे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच तिने शनिवारी या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी चौकशीअंती गोविंद मांजरेकर याला अटक केली होती. तर त्याचा सहकारी सूरज नाईक पोलिसांच्या हाती लागला नव्हता. काल सोमवारी त्याला अटक करण्यास पोलिसांना यश आले. सूरज नाईक याचे वास्तव्य सध्या चिखली येथे आहे. या फसवणूक प्रकरणी वास्को पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, रविवारी अटक करण्यात आलेल्या गोविंद मांजरेकर याची न्यायालयाने सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे.