विधानसभेतील यशानंतर आता महापालिका ‘लक्ष्य’
बदलेल्या राजकीय समीकरणाचा महापालिकेवर होणार परिणाम
महायुतीचे विधानसभेतील मताधिक्य महाविकास समोर ठरणार डोकेदुखी
मनपात पुन्हा सत्तेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना करावा लागणार संघर्ष
कोल्हापूर/आशिष आडिवरेकर
उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात काही प्रभागात काँग्रेसमधील कारभारी नगरसेवकांचे प्राबल्य आहे. असे असतानाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना त्या प्रभागामध्ये मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आली आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणसह सर्वच 10 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे. विधानसभेला मिळालेल्या यशानंतर आता त्यांचे लक्ष्य कोल्हापूर महापालिका निवडणूक असणार आहे.
महापालिकेत गेली दहा वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असल्यामुळे शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी बळकट होत गेली. याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीमध्येही याच पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संदर्भ बदलले असून काँग्रेस - राष्ट्रवादीचे नगरसेवक असणाऱ्या प्रभागातही शिवसेना आणि भाजपला विजयी मताधिक्य मिळाले आहे. लोकसभेला मिळालेले मताधिक्य टिकवण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरल्याने याचे पडसाद महापालिकेच्या राजकारणातही उमठणार आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे) गटाच्या विरोधात भाजप-शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाने बांधलेली मोट आगामी होणाऱ्या मनपाच्या निवडणुकीत एकसंघ ठेवण्याचे आवाहन महायुतीसमोर असणार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या 81 प्रभागांपैकी उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये 49 तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 32 प्रभागांचा समावेश आहे. 2010 पासून महापालिकेच्या राजकारणात आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ एकत्र आहेत. 2015 च्या निवडणुकीनंतर त्यांच्यासोबत शिवसेनाही आली. निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढत असले तरी, निवडणुकीनंतर एकत्र येऊन महापालिकेवर ते एकहाती झेंडा फडकवत आहेत. राष्ट्रवादीतील बंडानंतर मंत्री हसन मुश्रीफ भाजप आणि शिवसेनेसोबत (महायुती) आहेत. यामुळे कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रवादीचे बहुतांशी नगरसेवकही मुश्रीफ यांच्याच सोबत आहेत. भाजपचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक तसेच शिंदे गटाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ हे आता महायुती म्हणून जिह्यात एकत्र असणार आहेत.
नुकत्याच झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणाऱ्या राजेश क्षीरसागर 29 हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. तर महायुतीमध्ये मात्र, क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापसून सर्वजण एकजुटीने त्यांच्या प्रचार केला. याचाच परिणाम क्षीरसागर विजयी झाले. या घवघवीत यशानंतर महापालिकेच्या निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होणार काय हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 2015 च्या निवडणुकीत सतेज पाटील, हसन मुश्रीफ एकत्र होते. आताचे राजकीय समीकरण पाहता मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक विरूद्ध आमदार सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती, शिवसेना उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील असा होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक महायुती विधानसभेप्रमाणे एकसंघपणे लढवणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मनपा निवडणुकीची प्रतीक्षा
तुर्तास राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण याचिका, प्रभाग रचना आणि संख्या यासाठी महापालिकेच्या निवडणूका थांबल्या आहेत. महापालिकेवर नोव्हेंबर 2020 पासून आजपर्यंत प्रशासक आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजनेमुळे मिळालेले यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये मिळेल, असा विश्वास महायुतीमधील नेत्यातून व्यक्त होत आहे. यामुळे मनपा निवडणुकीची आता प्रतीक्षा आहे.
राष्ट्रवादीच्या त्या नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष
लोकसभा निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ यांना मानणाऱ्या नगरसेवकांनी थेट शाहू महाराज यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती. सध्या राज्यात महायुती पुन्हा सत्तेवर आली आहे. यामुळे महापालिकेच्या निवडणूकीमध्ये त्या नगरसेवकांची काय भूमिका असणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
बालेकिल्यातील घटलले मताधिक्य पुन्हा मिळविण्याचे आव्हान
उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात काही प्रभागात काँग्रेसमधील कारभारी नगरसेवकांचे प्राबल्य आहे. असे असतानाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना त्या प्रभागामध्ये मताधिक्य मिळाले आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभागात पुन्हा महाविकास आघाडीला येथून मताधिक्य घेण्याचे आव्हान नेत्यांसमोर ठरणार आहे.