कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेनंतर ‘फोर्डो’वर इस्रायलचा हल्ला

06:58 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आण्विक तळ उद्ध्वस्त, 15 विमाने नष्ट, इराणकडून अमेरिकेला धमकी, योग्यवेळी प्रतिप्रहार करणार

Advertisement

वृत्तसंस्था / तेल अवीव, तेहरान

Advertisement

अमेरिकेने इराणचे तीन आण्विक तळ उद्ध्वस्त केल्यानंतर आता इस्रायलनेही इराणमधील सर्वात मोठ्या फोर्डो या आण्विक तळावर वायुहल्ला चढविला आहे. या हल्ल्यात या तळाचे उरलेले भागही नष्ट झाल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. तसेच इस्रायलने इराणच्या 15 वायुतळांवरही मोठे हल्ले चढविले असून इराणची 15 युद्धविमाने जागीच निकामी केली आहेत. तर, अमेरिकेने प्रारंभ केला आहे. आता आम्ही या युद्धाचा शेवट करणार आहोत, अशी धमकी इराणने दिली आहे.

फोर्डो तळावर इस्रायलने हल्ला केल्याचे इराणनेही मान्य केले आहे. इराणच्या सरकारी नियंत्रणातील तस्नीम या वृत्तसंस्थेने स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वक्तव्याच्या आधारावर या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध पेले आहे. पाठोपाठ दोन दिवस झालेल्या या प्रचंड हल्ल्यांमुळे इराणची मोठी हानी झाली असून, त्या देशाचा अणुबाँब निर्माण करण्याचा कार्यक्रम किमान 10 वर्षे मागे पडला आहे, अशीही चर्चा आहे. इराणने मात्र आपली हानी झाली नसल्याचे प्रतिपादन केले आहे.

‘जुगारी’ डोनाल्ड ट्रम्प

इराणने रविवारच्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कठोर टीका केली. जुगारी ट्रम्प यांनी अत्यंत चुकीचे पाऊल उचलले आहे. त्यांनी आम्हाला दुखावले आहे. आता आम्ही योग्यवेळी, योग्यप्रकारे आणि योग्य प्रमाणात अमेरिकेच्या हल्ल्याचा बदला घेणार आहोत, अशी भाषा इराणच्या नेत्यांनी केली असून, अमेरिकेने प्रारंभ केलेला हा संघर्ष आम्ही संपविणार आहोत, असा इशाराही दिला आहे.

तेहरान शहरात जागोजागी आगी

सोमवारी इस्रायलने केलेल्या वायुहल्ल्यांमुळे इराणची राजधानी असलेल्या तेहरान शहरात जागोजागी मोठ्या आगी लागल्या आहेत, अशी माहिती अनेक स्थानिकांनी वृत्तसंस्थांशी बोलताना दिली आहे. विशेषत: दक्षिण तेहरानमध्ये असलेल्या इराणच्या लष्करी तळांना इस्रायलकडून लक्ष्य करण्यात आले होते. इराण आपला अणुकार्यक्रम सोडून देत नाही, तोपर्यंत त्या देशावर हल्ले चालूच राहतील, असे संकेत इस्रायलने दिले आहेत. त्यामुळे हा संघर्ष प्रदीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे.

15 विमाने नष्ट केल्याचे प्रतिपादन

इराणची प्रतिहल्ला करण्याची क्षमता मोडीत काढण्यासाठी इस्रायलने त्याच्या वायुतळांना लक्ष्य केले आहे. या वायुतळांवर स्थित असणारी इराणची 15 युद्ध विमाने नष्ट केल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. ही विमाने रशियाने इराणला पुरविलेली होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे. प्रतिहल्ला करण्याची उसंत इराणला मिळू नये, असाही अमेरिकेचा आणि इस्रायलचा उद्देश आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सहा वायुतळ पूर्णत: नष्ट झाले असण्याची शक्यता आहे. या हल्ल्यासाठी इस्रायलच्या सेनेने एफ-14 आणि एफ-5 ही विमाने आणि एएच-1 ही हेलिकॉप्टर्स उपयोगात आणली आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.

फोर्डो सर्वात महत्त्वाचा तळ

फोर्डो हा इराणचा सर्वात महत्त्वाचा आण्विक तळ मानला जातो. येथेच इराणचे अण्वस्त्र निर्माण करण्याचे सर्वात महत्त्वाचे केंद्र आहे. हा तळ नतान्झ या आणखी एका तळापेक्षा लहान असला तरी तो अत्याधुनिक सामग्रीचा उपयोग करून निर्माण करण्यात आला होता. तो तेहरानपासून 95 किलोमीटरवर असलेल्या एका डोंगराच्या तळाशी असून त्याच्या बांधकामाचा प्रारंभ 2006 मध्ये करण्यात आला होता. 2009 मध्ये तो पूर्ण झाल्यानंतर इराणने त्याची जाहीररित्या घोषणा केली होती. या तळावर युरेनियम संपृक्त करण्याचे कार्य करण्यात येत होते. तसेच अणुबॉम्बसाठी लागणारी इतर महत्त्वाची सामग्रीही येथे उत्पादित केली जात होती. या तळाच्या निर्मितीसाठी 200 कोटी डॉलर्सचा खर्च करण्यात आला होता.

इराणचाही इस्रायलवर प्रतिहल्ला

इराणनेही सोमवारी इस्रायलवर प्रतिहल्ला केला. इराणने इस्रायलच्या विविध शहरांमधील नागरी वस्त्यांवर दिवसभरात एकंदर 15 दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यांच्यापैकी तीन क्षेपणास्त्रे, हायफा, जेरुसलेम आणि तेल अवीव या शहरांवर पडल्याची माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यात सहा इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तथापि, जीवीत हानी झालेली नसल्याचे वृत्त आहे. हायफावर क्षेपणास्त्र पडण्यापूर्वी नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला नव्हता, अशी तक्रार काही स्थानिक नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना केली. इराणच्या हल्ल्यात इस्रायलचे चार नागरिक जखमी झाले आहेत, अशीही माहिती दिली गेली आहे.

इराणची क्षेपणास्त्रे उद्ध्वस्त

रविवारी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे क्षेपणास्त्रनिर्मिती केंद्र उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त होते. सोमवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणची काही दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र उद्ध्वस्त झाली आहेत, असे इस्रायलचे म्हणणे आहे. इराणकडे दीर्घ पल्ल्याची 800 ते 900 क्षेपणास्त्रे असण्याची शक्यता आहे. त्यांच्यापैकी आतापर्यंत 200 क्षेपणास्त्रे त्या देशाचे उपयोगात आणली आहेत. याशिवाय ड्रोन आणि काही कमी प्रतीच्या क्षेपणास्त्रांचाही उपयोग इराणकडून करण्यात आला आहे.

इराणची क्षमता नष्ट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारच्या हल्ल्यांच्या संदर्भात सोमवारी पुन्हा वक्तव्य केले. इराणचे तीन अणुतळ या हल्ल्यात संपूर्ण नष्ट झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विशेषत: इराणच्या युरेनियम संपृक्तीकरण करणाऱ्या केंद्राला पूर्णत: नष्ट करण्यात आल्याने इराणची अणुबाँब बनविण्याची क्षमता विपरीतरित्या प्रभावीत झाली असल्याचे म्हणणे ट्रम्प यांनी मांडले आहे.

चीन, रशियाची हालचाल नाही

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने चीन आणि रशिया हे देश इराणच्या बाजूने उतरतील अशी अपेक्षा होती. तथापि, तशी कोणतीही हालचाल निदान आतापर्यंत तरी पहावयास मिळालेली नाही. अमेरिकेच्या हल्ल्यासंदर्भात चीनने अद्याप अधिकृत प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही. रशियाने तर आपण त्रयस्थ राहू असेच संकेत दिले आहेत. पाकिस्तानने अमेरिकेवर जोरदार टीका केली असून अमेरिकेच्या कृतीमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ब्रिटनने अमेरिकेचे समर्थन केले असून इराणला अणुबाँब बनविण्यापासून रोखणे आवश्यकच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फ्रान्सने त्वरित शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले असून संघर्ष थांबविण्याची मागणी केली आहे.

इराण पडला एकाकी...

गेले दहा दिवस चाललेल्या या संघर्षात इराण एकाकी पडल्याचे दिसत आहे. बव्हंशी मुस्लीम राष्ट्रांनी त्याला साहाय्य तर केले नाहीच, पण सहानुभूमीही व्यक्त केलेली नाही. इराणने अणुबाँब बनवू नये, अशी अनेक अरब मुस्लीम देशांची इच्छा आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. अनेक देशांनी इराणला केवळ तोंडदेखली सहानुभूती व्यक्त केलेली आहे, असे दिसून येत आहे.

ट्रम्प यांनी दिला चकवा

इराणवर हल्ला करण्यासाठी ट्रम्प पाकिस्तानचे साहाय्य घेतील अशी शक्यता वाटत होती. पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना त्यांनी शाही भोजन दिले, असेही वृत्त पसरले होते. तसेच दोन आठवड्यांनी आम्ही पुढच्या निर्णय घेऊ, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्ष हल्ला त्यांनी दोनच दिवसांमध्ये केला. तसेच हा हल्ला करताना पाकिस्तानचे किंवा इराणच्या आसपासच्या कोणत्याही मुस्लीम देशाचे सहकार्य त्यांनी घेतले नाही. अमेरिकेची युद्ध विमाने थेट अमेरिकेहूनच आणण्यात आली आणि हल्ल्यानंतर ती अमेरिकेला परतली आहेत.

दिवसभरातील घडामोडी

ड सोमवारी सकाळपासूनच इस्रायलचे इराणच्या तळांवर जोरदार वायुहल्ले

ड इराणकडूनही प्रत्युत्तरात इस्रायलच्या महत्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रहल्ले

ड इराणचे अनेक वायूतळ-युद्ध विमाने नष्ट केल्याचे इस्रायलचे प्रतिपादन

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article