For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर ‘भरता’ने पादुका पटकावल्याच !

06:30 AM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
अखेर ‘भरता’ने पादुका पटकावल्याच
Advertisement

एक-दोन दिवसात काँग्रेस संसदीय पक्ष बैठक होणार आहे. या बैठकीत सिद्धरामय्या हेच डी. के. शिवकुमार यांचे नाव सुचवणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात नवे मंत्रिमंडळ डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात येणार आहे. चार उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याची चर्चाही सुरू झाली आहे.

Advertisement

अपेक्षेप्रमाणे पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर काँग्रेस हायकमांडने कर्नाटकातील सत्तासंघर्षाला पूर्णविराम देण्याचे काम हाती घेतले आहे. मंगळवारी नवी दिल्ली येथे राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एक-दोन दिवसात काँग्रेस संसदीय पक्ष बैठक होणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकात वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला हायकमांडच्या निर्णयाने पूर्णविराम मिळाला असला तरी हे बदल जनता कसे स्वीकारणार? यावर काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे.

नेहमी गरीब, मध्यमवर्गीय व वंचितांच्या हिताचा विचार व त्यांच्यासाठी राजकारण करणारे सिद्धरामय्या यांना मानणारा मोठा वर्ग कर्नाटकात आहे. निजदमधून बाहेर पडण्याआधीच कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी अहिंद (अल्पसंख्याक, मागासवर्गीय व दलित) वर्गाची मोट बांधून त्यांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले होते. या प्रयत्नांचे फळ त्यांना मिळाले. सिद्धरामय्या हेच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, कर्नाटकात नेतृत्वबदलाचा प्रश्नच येत नाही, असे त्यांचे समर्थक सांगत होते. शेवटी हायकमांडने नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी त्यांना राजीनामा देण्याची सूचना केली आहे. या सूचनेचे त्यांनी पालनही केले आहे.

Advertisement

सिद्धरामय्या राजीनामा देणार, हे जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांच्या समर्थकांनी आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी राजीनामा देऊ नये यासाठी दबाव वाढला तरी हायकमांडच्या सूचनेनंतर आपण एक क्षणही मुख्यमंत्रिपदावर राहणार नाही, असे वारंवार जाहीर करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला आहे. गुरुवारी राज्यपाल परराज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सचिवांकडे राजीनामा सोपविण्यात आला आहे. आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे येणार, हे स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत सिद्धरामय्या यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी त्यांच्या समर्थक नेत्यांनी भरपूर प्रयत्न केले. आपण कधीच सत्ता आणि पैशाच्या मागे लागलो नाही. संविधानाला आणि बुद्ध, बसव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीचा आदर करीत आपण राजकारण केले. शेवटच्या श्वासापर्यंत जातीयवादी शक्तींविरुद्ध आपला लढा सुरू असणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी जाहीर केले आहे.

2023 च्या निवडणुकीनंतर अडीच वर्षांचे सत्तासूत्र ठरले आहे. त्यामुळे अडीच वर्षांनंतर सिद्धरामय्या यांना राजीनामा द्यावा लागणार, अशी चर्चा अधूनमधून व्हायची. असे ठरले आहे की नाही? हे कधीच स्पष्ट झाले नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतरही या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित राहिले आहे. हायकमांडने आपल्याला राष्ट्रीय राजकारणात बोलावले आहे. आपण नम्रपणे ती ऑफर नाकारली आहे, असे सांगतानाच आपण राज्य राजकारणातच राहणार हे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे. एक-दोन दिवसात काँग्रेस संसदीय पक्ष बैठक होणार आहे. या बैठकीत सिद्धरामय्या हेच डी. के. शिवकुमार यांचे नाव सुचवणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात नवे मंत्रिमंडळ डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात येणार आहे. चार उपमुख्यमंत्रिपद निर्माण करण्याची चर्चाही सुरू झाली आहे.

सिद्धरामय्या समर्थक नेत्यांना हा बदल मान्य नाही. संसदीय पक्ष बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा, यासाठी मतदान घ्यावे, अशी मागणी सिद्धरामय्या समर्थक नेत्यांनी केली आहे. उघडपणे या मागणीचे कोणी सूतोवाच केले नसले तरी पक्षाच्या व्यासपीठावर असे प्रयत्न सुरू आहेत. जर मतदान झाले तर गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे नाव पुढे करण्याची तयारी केली आहे. सिद्धरामय्या यांना बाजूला करायचे असेल तर एखाद्या दलित नेत्याला मुख्यमंत्रिपद द्यावे, ही मागणी आधीपासूनच होत होती. आता या मागणीला जोर आला आहे. कर्नाटकातील घडामोडींवर हायकमांड बारकाईने लक्ष ठेवून आहे. कर्नाटकाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला हे कर्नाटकात तळ ठोकून आहेत.

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाले तर आजपर्यंत वक्कलिग समाजाचे आम्हीच निर्विवाद नेते आहोत, असे दावा करणारे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या अस्तित्वाला मोठा धक्का बसणार आहे. या अस्तित्वाच्या लढाईतील डी. के. शिवकुमार विरुद्ध कुमारस्वामी हा संघर्ष रंगणार आहे. या संघर्षाला सिद्धरामय्या समर्थकांनी हातभार लावला तर शिवकुमार यांचे जगणे मुश्कील होणार आहे. नव्या सरकारमध्ये सिद्धरामय्या समर्थकांना कोणते स्थान असणार आहे? यावर सरकारचे भवितव्य ठरणार आहे. सध्या आम्ही सारे एक आहोत, असे चित्र काँग्रेस नेते दाखवत असले तरी पक्षांतर्गत लाथाळ्या कधीही डोके वर काढू शकतात, अशी स्थिती आहे. डी. के. शिवकुमार यांची पक्षनिष्ठा, गांधी घराण्याप्रतीची त्यांची निष्ठा आदींचे फळ त्यांना मिळाले असले तरी हे फळ गोड आहे की कडवट? हे येणारा काळच ठरवणार आहे.

रमेश हिरेमठ

Advertisement
Tags :

.