७० दिवसांचा प्रवास करून लंडनला पोहोचली दिंडी
पंढरपूर / चैतन्य उत्पात :
अवघ्या देशभरात सुप्रसिद्ध असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचली असून 70 दिवसांचा आणि 22 देशातून प्रवास करून लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची दिंडी बुधवारी पोहोचली आहे.
पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी बुधवारी दि. 25 रोजी तब्बल 70दिवसांचा प्रवास आणि 22 देशातील प्रवास करून लंडन येथील सुप्रसिद्ध टॉवर ब्रीज जवळ आली. भारतीय उद्योजक अनिल खेडकर व सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे प्रयत्नशील होते. महाराष्ट राज्यातील सातशे वर्षांची जुनी परंपरा, राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल जगभरात पोहोचणार आहे.
याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले, मी गेल्या 7 वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे, अमेरिका, लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत, इस्कॉन, अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत. पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर नाही, यासाठी वारी साता समुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वारीतील प्रेम, जिव्हाळा, सलोखा मी अनुभवला आहे. याचा लाभ जगभरात व्हावा ही प्रामाणिक ईच्छा आहे असे ते म्हणाले.
परदेशात मॉरिशस, जर्मनी, न्यू जर्सी येथे भारतीय मंदिरे आहेत, पण वारीची परंपरा, विश्वमालक पांडुरंग यांचे मंदिर नाही, ही मराठी माणसाची खंत होती.खरेतर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकत होत्या, पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात, यासाठी सुमारे 22देशातून ही दिंडी नेण्यात आली. दिनांक, 15 एप्रिल पासून मार्गस्थ झाली होती.
यासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुर्ण सहकार्य केले असून कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी उत्तम नियोजन केले होते. या उपक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार उदयनराजे भोसले, एमआयटीचे विश्वनाथ कराड यांनी शुभेच्छा देऊन सर्वतोपरी मदत केली. यूके मधील 48मराठी मंडळ, आखात, जर्मनी, आयर्लंड, अमेरिका येथील मराठी मंडळ संलग्न असून दोन ते तीन वर्षात 6 एकर जागेत भव्य मंदिर उभे करण्यात येणार आहे.