अमेरिकेकडून 50 वर्षांनी ‘चांद्र मोहीम’ प्रक्षेपित
उड्डाणाच्या काही वेळातच बिघाड
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चंद्रावर लँडिंगसाठी प्रक्षेपित झालेले अमेरिकेचे पेरेग्रीन अंतराळयानात बिघाड झाला आहे. हे अंतराळयान माउंट एव्हरेस्टमधील एक तुकडा, पृथ्वीवरून संदेश आणि मानवी अवशेष घेऊन चंद्राच्या दिशेने जात होते. परंतु याच्या प्रोफेलेंटमध्ये समस्या निर्माण झाली आहे. अंतराळयान तयार करणारी कंपनी एस्ट्रोबोटिक टेक्नॉलॉजीने याची पुष्टी दिली आहे. 50 वर्षांमध्ये अमेरिकेने पहिल्यांदाच चांद्रमोहीम हाती घेतली आहे. हे यान सोमवारी सकाळी फ्लोरिडातून प्रक्षेपित करण्यात आले होते. परंतु प्रक्षेपणाच्या 24 तासांपेक्षाही कमी वेळात ही मोहीम संकटात सापडली आहे.
मोहीम संकटात आहे. स्वत:च्या बुस्टरपासून विभक्त झाल्यावर लँडरला एका समस्येला सामोरे जावे लागले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 23 फेब्रुवारी रोजी यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याची कंपनीची योजना होती, परंतु हे यान सध्या चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे. चंद्रावर लँडर उतरविण्याशी निगडित प्रक्षेपण मागील वर्षी रशियाने देखील केले होते. 50 वर्षांनी रशियाने चंद्रासाठी मोहीम प्रक्षेपित केली होती. परंतु त्याच्या लूना-25 ला यश मिळाले नव्हते.
एस्ट्रोबोटिकनुसार पेरेग्रीनच्या पहिल्या छायाचित्रात मल्टी लेयर इंसुलेशन (एमएलआय) मध्ये कथित स्वरुपात गडबड दिसून आली होती. प्रोपेलेंटमधील बिघाडासाठी तेच कारणीभूत ठरले असू शकते. पहिल्या कम्युनिकेशन ब्लॅकआउटनंतर आता अंतराळयानाची बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे. अंतराळयान संचालित करण्यासाठी पेरेग्रीनच्या वर्तमान शक्तीचा शक्य तितका वापर केला जात आहे. पेरेग्रीनच्या सोलर पॅनेलला सूर्याच्या दिशेत करण्यासाठी वैज्ञानिकांनी अन्य पद्धतींचा वापर केला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.