For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनमध्ये 14 वर्षानंतर सत्तांतर

06:58 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनमध्ये 14 वर्षानंतर सत्तांतर
Advertisement

मजूर पक्षाचा दणदणीत विजय : संसदेच्या 650 पैकी 412 जागांवर यश : हुजूर पक्षाची सत्ता समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था / लंडन

ब्रिटनमध्ये झालेल्या सांसदीय सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाची मोठी सरशी झाली आहे. गेली 14 वर्षे सत्तेत असणाऱ्या हुजूर पक्षाचा पराभव झाला असून मजूर पक्षाला ब्रिटनच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहाच्या 650 पैकी 412 जागांवर यश मिळाले आहे. तर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांच्या नेतृत्वात या निवडणुकीत उतरलेल्या हुजूर पक्षाला केवळ 120 जागांवर समाधान मानावे लागले आहे. लेफ्ट डेमॉक्रेट आघाडीला 72 तर अन्य पक्षांना 44 जागा मिळाल्या आहेत. अतिउजव्या रिफॉर्म पक्षाचेही प्रथमच चार सदस्य निवडून आले आहेत.

Advertisement

गुरुवारी ब्रिटनमध्ये या निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. मतदानानंतर त्वरित मतगणनेला प्रारंभ करण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सहा वाजेपर्यंत चित्र स्पष्ट झाले होते. यावेळी हुजूर पक्षाला मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागणार, असे अनुमान सर्व मतदानपूर्व सर्वेक्षणांमध्ये व्यक्त करण्यात आले होते. त्यानुसारच या निवडणुकीचा परिणाम समोर आला आहे. मजूर पक्षाचा जवळपास दीड दशकानंतर मोठा विजय झाला आहे.

सुनक यांची नामुष्की टळली

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे हुजूर पक्षाचे नेते सध्या ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ते स्वत:च्या रिचमंड-नॉर्थलेर्टन मतदारसंघातून पराभूत होतील, अशी शक्यता मतदानपूर्व सर्वेक्षणांमधून व्यक्त करण्यात आली होती. तथापि, त्यांनी आपली जागा राखली आहे. ब्रिटनच्या लोकशाहीच्या साडेतीनशे वर्षांपेक्षा अधिक काळाच्या इतिहासात कधीही विद्यमान पंतप्रधान पराभूत झालेला नाही. ती नामुष्की कदाचित सुनक यांच्या वाट्याला येईल, असे भाकित करण्यात आले होते. तथापि, या संदर्भात मतदानपूर्व सर्वेक्षणाची अनुमाने चुकीची ठरल्याचे दिसून येत आहे.

केर स्टार्मर होणार पंतप्रधान

मजूर पक्षाचे नेते केर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान होणार आहेत. हा नव्या परिवर्तनाचा प्रारंभ आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या पक्षाच्या विजयाचे वर्णन केले. त्यांनी ब्रिटीश मतदारांचे आभार मानले असून त्यांच्या सेवेसाठी आपण आणि आपला पक्ष सज्ज असल्याचे प्रतिपादन केले. मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपल्या पक्षाचा पराभव मान्य केला असून स्टार्मर यांचे अभिनंदन केले आहे. ब्रिटनच्या हितासाठी आपण नेहमीच कार्यरत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुनक यांनी शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे त्यागपत्र सादर केले आहे.

भारताशी संबंध दृढ करणार

आपल्या नेतृत्वातील सरकार भारताशी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलणार आहे. भारताशी करमुक्त व्यापाराचा करार करण्यासाठी आपण वेगाने प्रयत्न करणार आहोत. गेली दहा वर्षे असे प्रयत्न होत असले तरी अद्याप त्यांना यश आलेले नाही. आता ब्रिटनमध्ये नवा प्रारंभ होत आहे. आपले सरकार या कराराला प्राधान्य देणार आहे, असे स्टार्मर यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.

50 टक्क्यांहून अधिक मते

यावेळी मजूर पक्षाला एकंदर मतदानाच्या 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाल्याचे दिसून येत आहे. असा विजय गेल्या 25 वर्षांमध्ये कोणत्या पक्षाला मिळविता आलेला नाही. ब्रिटनमध्ये हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष असे दोन प्रमुख पक्ष असून लेफ्ट डेमॉव्रेट ही तिसरी आघाडी आहे. अतीउजव्या पक्षालाही काही भागांमध्ये मोठे समर्थन आहे. 1979 ते 1997 अशी सलग अठरा वर्षे हुजूर पक्षाच्या हाती  या देशाची सत्ता राहिली होती. त्यानंतर 1997 ते 2010 अशी तेरा वर्षे मजूर पक्षाची तर 2010 ते 2024 अशी 14 वर्षे पुन्हा हुजूर पक्षाची सत्ता होती.

काश्मीर धोरणात परिवर्तन

2019 मध्ये मजूर पक्षाचे नेतृत्व जेरेमी कॉर्बिन या नेत्याकडे होते. हा नेता पाकिस्तानचा समर्थक म्हणून ओळखला जात होता. काश्मीर हा भारताचा भूभाग असल्याची वस्तुस्थिती त्यावेळी मजूर पक्षाला मान्य नव्हती. कॉर्बिन यांनी 2019 मध्ये ब्रिटीश संसदेत एक तातडीचा प्रस्ताव मांडला होता. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना काश्मीरमध्ये प्रवेश करु दिला गेलाच पाहिजे, असा आग्रह या प्रस्तावात होता. भारताने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. मजूर पक्षाच्या त्यावेळच्या धोरणामुळे भारताशी असलेले त्या पक्षाचे संबंध तणावग्रस्त झाले होते. तथापि, केर स्टार्मर यांच्याकडे मजूर पक्षाचे नेतृत्व आल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाच्या काश्मीर धोरणात मोठे परिवर्तन केले. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे. तसेच भारतात जे घटनात्मक मुद्दे उपस्थित होतात, ते हाताळण्यासाठी भारतीय संसद समर्थ आहे. आम्ही हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, अशी स्पष्ट आणि भारताला अनुकूल असणारी भूमिका त्यांनी उघडपणे घेतली. तसेच 2024 मधील सांसदीय निवडणुकीच्या वचनपत्रातही याचा स्पष्ट उल्लेख केला. त्यामुळे मजूर पक्षाच्या काश्मीर धोरणात आमूलाग्र परिवर्तन झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. परिणामी, भारताशी संबंध अधिक दृढ होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता मोकळेपणाने चर्चा होऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजूर पक्षाचे नेते केर स्टार्मर यांना अभिनंदनाचा संदेश पाठविला आहे. आपल्या कार्यकाळात भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देश अधिक नजीक येतील असा माझा विश्वास आहे, अशी भावना त्यांनी संदेशात व्यक्त केली आहे. मावळते नेते ऋषी सुनक यांनाही त्यांनी संदेश पाठविला असून सहकार्यासाठी त्यांचे आभार मानले आहेत.

भारतीय वंशाचे अनेक विजयी

ब्रिटनमधील सांसदीय निवडणुकीत हुजूर आणि मजूर पक्षाचे 18 भारतीय वंशाचे उमेदवार विजयी झाले आहेत. सर्वाधिक उमेदवार मजूर पक्षाचे आहेत. त्यामुळे ब्रिटनच्या राजकारणात आता तेथील भारतीय वंशाच्या नागरीकांचा प्रभाव वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मजूर पक्ष- 1. कनिष्क नारायण, 2. नवेंदू मिश्रा, 3. प्रीत कौर गिल, 4. तनमनजीनसिंग ढेसी, 5. व्हॅलेरी वाझ, 6. सोनिया कुमार, 7. हरप्रीत उप्पल, 8. सीमा मल्होत्रा, 9. वरींदर जूस, 10. गुरींदर जोसन, 11. जस अठवाल, 12. बॅगी शंकर, 13. सतवीर कौर.

हुजूर पक्ष- 1. ऋषी सुनक (मावळते पंतप्रधान), 2. शिवानी राजा, 3. सुएला बेव्हरमन, 4. प्रीती पटेल, 5. डॉ. नील शास्त्री

Advertisement
Tags :

.