For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द. आफ्रिकेचे न्यूझीलंडला 267 धावांचे आव्हान

06:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
द  आफ्रिकेचे न्यूझीलंडला 267 धावांचे आव्हान
Advertisement

दुसरी कसोटी तिसरा दिवस : डेव्हिड बेडिंगहॅमचे शतक, ओरुरकीचे 5 बळी

Advertisement

वृत्तसंस्था /हॅमिल्टन

येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने यजमान न्यूझीलंडला विजयासाठी खेळाच्या तिसऱ्या दिवशी 267 धावांचे आव्हान दिले असून न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 1 बाद 40 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात डेव्हिड बेडिंगहॅमने शानदार शतक झळकवले तर न्यूझीलंडच्या ओरुरकेने 34 धावात 5 गडी बाद केले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 242 धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 211 धावा जमविल्याने दक्षिण आफ्रिकेने 31 धावांची आघाडी मिळविली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 235 धावात आटोपल्याने न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 267 धावांचे आव्हान मिळाले. न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाअखेर 1 बाद 40 धावा जमविल्या. या कसोटीतील शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी आणखी 227 धावांची गरज असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाअखेर 6 बाद 220 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडचा डाव 211 धावांत आटोपला होता. दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी आपल्या दुसऱ्या डावाला सुरूवात केली पण ओरुरकेच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज अधिक धावा जमवू शकले नाही. त्याला केवळ डेव्हिड बेडिंगहॅमचे शतक अपवाद म्हणावे लागेल. कर्णधार निल ब्रँडने 60 चेंडूत 6 चौकारांसह 34, हमजाने 2 चौकारांसह 17, किगेन पिटरसनने 79 चेंडूत 6 चौकारांसह 43 धावा जमविल्या. ओरुरकेच्या अचूक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेची एकवेळ स्थिती 3 बाद 39 अशी केविलवानी झाली होती. हमजा आणि बेडिंगहॅम यांनी चौथ्या गड्यासाठी 65 धावांची भागिदारी केली. हमजा बाद झाल्यानंतर पिटरसनकडून बेडिंगहॅमला चांगली साथ मिळाली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 98 धावांची भर घातल्याने दक्षिण आफ्रिकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. पिटरसन बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे 5 गडी केवळ 33 धावात तंबूत परतले. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 267 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडतर्फे ओरुरकीने 34 धावात 5 तर फिलिप्सने 50 धावात 2 तसेच हेन्री, रचिन रवींद्र आणि वॅग्नर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. खेळाच्या शेवटच्या सत्रात न्यूझीलंडने दुसऱ्या डावात सावध सुरूवात केली. पण दक्षिण आफ्रिकेच्या पिडेटने कॉन्वेला 17 धावांवर पायचीत केले. तिसऱ्या दिवशीच्या खेळातील शेवटच्या चेंडूवर कॉन्वे बाद झाला. लॅथम 3 चौकारांसह 21 धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका प. डाव 242, न्यूझीलंड प. डाव 211, दक्षिण आफ्रिका दु. डाव 69.5 षटकात सर्व बाद 235 (बेडिंगहॅम 110, पिटरसन 43, ब्रँड 34, अवांतर 15, ओरुरकी 5-34, फिलिप्स 2-50, हेन्री 1-15, रचिन रवींद्र 1-50, वॅग्नर 1-42), न्यूझीलंड दु. डाव 1 बाद 40 (लॅथम खेळत आहे 21, कॉन्वे 17, पिडेट 1-3).

Advertisement
Tags :

.