For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आफ्रिकेने बांगलादेशला 106 धावांवर गुंडाळले

06:58 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
आफ्रिकेने बांगलादेशला 106 धावांवर गुंडाळले
Advertisement

पहिली कसोटी : द.आफ्रिकेची खराब सुरुवात, दिवसअखेरीस 6 बाद 140 धावा

Advertisement

वृत्तसंस्था/ मिरपूर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत बांगलादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मिरपूर येथे सुरु असलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 106 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर द.आफ्रिकेच्या डावाची खराब सुरुवात झाली असून पहिल्या दिवसअखेरीस पाहुण्या संघाने 41 षटकांत 6 बाद 140 धावा केल्या आहेत. आफ्रिकेकडे 34 धावांची आघाडी असून मुल्डर 17 तर व्हेरेन 18 धावांवर खेळत होते.

Advertisement

प्रारंभी, बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. मिरपूरच्या खेळपट्टीवर द.आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा संपूर्ण संघ हा 106 धावात गारद झाला महमुदुल हसन जॉयने सर्वाधिक 30 धावा केल्या. मुशफिकूर रहीमने 11, तैजुल इस्लामने 16 तर मेहदी हसन मिराजने 13 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. बांगलादेशचे सहा फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. द.आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, वियान मुल्डर व केशव महाराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

आफ्रिकेचेही लोटांगण

बांगलादेशने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा डावही गडगडला. कर्णधार मार्करम हा 6 धावा करुन बाद झाला. त्यानंतर टॉनी दी झोर्जी आणि ट्रिस्टन स्टब्सने डाव सावरला. पण दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. टॉनीने 30 तर ट्रिस्टन स्टब्सने 23 धावा केल्या. डेविड बेडिंगम 11 धावा, तर रायन रिकेल्टन 27 धावा करून बाद झाले. तर मॅथ्यू ब्रीझकेला खातेही खोलता आले नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने 6 गडी बाद 140 धावा केल्या आहेत. अफ्रिकेकडे 34 धावांची आघाडी आहे. कायल व्हेरेन 18 आणि वियान मुल्डर 17 धावांवर खेळत आहेत. बांगलादेशकडून तैजुल इस्लामने शानदार गोलंदाजी करताना 5 बळी घेतले तर मेहमुदने 1 बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश पहिला डाव सर्वबाद 106

द.आफ्रिका पहिला डाव 41 षटकांत 6 बाद 140 (झोर्जी 30, स्टब्ज 23, रिकेल्टन 27, व्हेरेन खेळत आहे 18, मुल्डर खेळत आहे 17, तैजुल इस्लाम 5 बळी, हसन मेहमुद 1 बळी).

रबाडाची ऐतिहासिक कामगिरी, डेल स्टेन, वकार युनूसला टाकले मागे

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कागिसो रबाडाने इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत 300 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. रबाडाने आपल्याच देशाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूससारख्या दिग्गजांना मागे टाकले. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या वकार युनूसच्या नावावर होता. त्याने 12,602 चेंडूत 300 कसोटी बळी पूर्ण केले होते. आता रबाडाने 11,817 चेंडूत 300 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने 12605 चेंडूत 300 कसोटी बळी पूर्ण केले होते.

सर्वात कमी चेंडूत 300 कसोटी बळी घेणारे गोलंदाज

कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) - 11,817 चेंडू

वकार युनूस (पाकिस्तान) - 12,602 चेंडू

डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) - 12,605 चेंडू

अॅलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका) - 13,672 चेंडू

Advertisement
Tags :

.