For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द आफ्रिकेचा भारतावर 3 गड्यांनी विजय

06:58 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
द आफ्रिकेचा भारतावर 3 गड्यांनी विजय
Advertisement

स्टब्ज-कोझी यांची निर्णायक खेळी, मालिकेत बरोबरी, चक्रवर्ती 5-17

Advertisement

वृत्तसंस्था / ► गकबेर्हा

रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेने भारताचा 6 चेंडू बाकी ठेऊन 3 गड्यांनी पराभव केला. या विजयामुळे चार सामन्यांच्या या मालिकेत द. आफ्रिकेने 1-1 अशी बरोबरी साधली. स्टब्ज आणि कोझी यांच्यात निर्णायक चिवट फलंदाजीच्या जोरावर द. आफ्रेकेने विजय हिसकावून घेतला. भारताच्या वरूण चक्रवर्तीचे प्रयत्न मात्र अपुरे ठरले. या मालिकेतील तिसरा सामना येत्या बुधवारी होणार आहे.

Advertisement

भारताने द आफ्रिकेला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले. भारताने 20 षटकात 6 बाद 124 धावा जमविल्या. त्यानंतर द. आफ्रिकेने 19 षटकात 7 बाद 128 धावा जमवित विजय नोंदविला.

 

रिक्लेटोन आणि हेंड्रीक्स या सलामीच्या जोडीने द. आफ्रिकेच्या डावाला चांगली सुरूवात करून देताना 17 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. अर्षदिप सिंगने रिक्लेटोनला रिंकुसिंगद्वारे झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. वरूण चक्रवर्तीच्या अचुक माऱ्यासमोर द. आफ्रिकेची मधलीफळी कोलमडली. वरूणच्या अप्रतिम चेंडूवर कर्णधार मारक्रेमचा त्रिफळा उडाला. त्याने 3 धावा जमविल्या. वरूण चक्रवर्तीने यानंतर हेंड्रीक्सला त्रिफळाचित केले. त्याने 21 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. वरूण चक्रवर्तीने जेनसेनला 7 धावावर त्रिफळाचित केल्याने द. आफ्रिकेवर अधिकच दडपण आले. वरूण चक्रवर्तीने आपल्या चौथ्या आणि शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर क्लासनला झेलबाद केल्याने भारताला विजयाची आशा निर्माण झाली. क्लासनने 2 धावा केल्या. द. आफ्रिकेचा अष्टपैलू डेव्हिड मिलर चक्रवर्तीच्या पहिल्याच चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचित्त झाला. यावेळी द. आफ्रिकेची स्थिती 12. 2 षटकात 6 बाद 66 अशी केवीलवाणी होती. स्टब्ज एका बाजूने चिवट फलंदाजी करत आपल्या संघाला विजयाच्या देशेने नेत होता. स्टब्जला सिमेलेनीने बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने 7 गड्यासाठी 20 धावांची भागीदारी केली. बिस्नाईने सिमेलेनेला 7 धावावर त्रिफळाचित केले. द. आफ्रिकेचे 7 गडी 15.4 षटकात 86 धावात तुंबूत परतल्याने भारताचे पारडे जड वाटत होते.

पण स्टब्ज आणि कोझी या जोडीने 8 व्या गड्यासाठी अभेद्य 42 धावांची भागीदारी करून आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. स्टज्बने 41 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 47, तर कोझीने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 19 धावा जमविल्या. भारतातर्फे चक्रवर्तीने 17 धावात 5 तर अर्षदिप सिंग आणि बिस्नोई यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला.  द. आफ्रिकेच्या डावात 2 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 34 धावा जमविताना 2 गडी गामविले. द. आफ्रिकेचे अर्धशतक 52 चेंडूत तर शतक 102 चेंडूत फलकावर लागले.

तत्पूर्वी चार सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून द. आफ्रिकेवर आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या सामन्यात द. आफ्रेकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचे पहिले तीन फलंदाज केवळ 15 धावात तंबुत परतले. डावातील पहिल्या षटकात सलामीच्या फलंदाज संजु सॅमसन जेनसेनच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचित झाला. त्यानंतर कोझीने अभिषेक शर्माला जेनसेनकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 4 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या सिमेलेनीने कर्णधार सुर्यकुमार यादवला 4 धावावर पायचित केले. भारताची यावेळी स्थिती 4 षटकात 3 बाद 15 अशी केवीलवानी होती. तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यानी चौथ्या गड्यासाठी 30 धावांची भागीदारी 4 षटकात नोंदविली. मारक्रेमने तिलक वर्माला मिलरकरवी झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविल्या.

अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांच्या कामगिरीमुळे भारताला 124 धावापर्यंत मजल मारता आली. अक्षर पटेल 12 षटकातील 5 व्या चेंडूवर एकेरीं धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने 21 चेंडूत 4 चौकारांसह 27 धावा जमविल्या. रिंकु सिंगने 11 चेंडूत 9 धावा केल्या. पिटरने त्याला झेलबाद केले. हार्दिक पांड्या आणि अर्षदीपसिंग याने 7 व्या गड्यासाठी अभेद्य 37 धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्याने 45 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह नाबदा 39 तर अर्षदिप सिंगने 6 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 7 धावा जमविल्या. भारताला 14 अवांतर धावा मिळाल्या. द. आफ्रिकेतर्फे जेनसेन, कोझी, सिमेलेनी, मारक्रेम आणि पिटर यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 34 धावा जमविताना 3 गडी गमविल्या. भारताचे अर्धशतक 53 चेंडूत तर शतक 101 चेंडूत फलकावर लागले. भारताच्या डावात तीन षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले.

संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकात 6 बाद 124 (हार्दिक पांड्या नाबाद 39, अक्षर पटेल 27, तिलक वर्मा 20, अर्षदीप सिंग नाबाद 7, रिंकु सिंग 9, सुर्यकुमार यादव 4, अभिषेक शर्मा 4, सॅमसन 0, अवांतर 14, जेनसेन, कोझी, सिमेलेनी, मारक्रेम, पिटर प्रत्येकी 1 बळी).  द. आफ्रिका 19 षटकात 7 बाद 128 (रिक्लेटोन 13, हेंड्रीक्स 24, मारक्रेम 3, स्टब्ज नाबाद 47, जेनसेन 7, क्लासन 2, मिलर 0, सिमेलेनी 7, कोझी नाबाद 19, अवांतर 6, वरूण चक्रवर्ती 5-17, अर्षदिप सिंग 1-41, बिस्नोई 1-21).

Advertisement
Tags :

.