हाफिज सईदला पाक सरकारकडून सुरक्षा
इस्लामाबाद :
दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तान सरकारने पुरविलेल्या सुरक्षेत राहत आहे. यासंबंधीचा खुलासा त्याचा पुत्र तल्हा सईदनेच केला आहे. हाफिज सईद अत्यंत आरामात राहत असून पाकिस्तान सरकार कधीच हाफिज सईदला भारताकडे सोपविण्याचा निर्णय घेणार नाही असा पूर्ण विश्वास असल्याचे तल्हा सईदने एका मुलाखतीत म्हटले आहे. तल्हा मागील काही काळापासून सातत्याने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून येत आहे. याचमुळे हाफिजच्या बिघडत्या आरोग्यादरम्यान तल्हाने त्याची जागा घेतल्याचे मानले जात आहे. एका मुलाखतीत तल्हाला पाकिस्तान सरकार भारताची जुनी मागणी मान्य करत हाफिज सईदला स्वाधीन करू शकते का असा प्रश्न विचारण्यात आला. पाकिस्तान सरकार कुठल्याही स्थितीत अशाप्रकारचे पाऊल उचलू शकत नाही. पाकिस्तान सईदला भारताकडे सोपविण्याचा विचारही करू शकत नसल्याचा दावा तल्हाने केला आहे.
हाफिज सईद पूर्णपणे सुरक्षित
हाफिज पूर्णपणे सुरक्षित असून त्याची प्रकृतीही उत्तम आहे. सध्या तो दिवसभर व्यस्त असतो असेही तल्हाने म्हटले. हाफिज सईद हा पाकिस्तान सरकारच्या संरक्षणात असून त्याला गुप्त ठिकाणी ठेवण्यात आल्याचे तल्हाच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी गटाचा संस्थापक आणि 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद हा भारताकरता मोस्ट वाँटेड आहे.