अफगाणला 133 धावांची आघाडी
दुसरी कसोटी, रेहमत शहाचे दमदार शतक
वृत्तसंस्था / बुलावायो
झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर असलेल्या अफगाण संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत दुसऱ्या डावात 6 बाद 219 धावा जमवित झिम्बाब्वेवर 133 धावांची आघाडी मिळविली आहे. अफगाणचा रेहमत शहा 116 धावांवर खेळत आहे.
या दुसऱ्या सामन्यात अफगाणने पहिल्या डावात 157 धावा जमविल्यानंतर झिम्बाब्वेने पहिल्या डावात 243 धावा जमवित 86 धावांची आघाडी मिळविली. झिम्बाब्वेच्या डावात सिकंदर रझा आणि कर्णधार इर्व्हिन यांनी शानदार अर्धशतके झळकविली. अफगाणच्या रशीद खानने 4 तर अहम्मदझाईने 3 आणि फरिद अहम्मदने 2 गडी बाद केले. 86 धावांनी पिछाडीवर असलेल्या अफगाणने शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 3 बाद 46 धावा जमविल्या होत्या.
अफगाणने शनिवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सावध सुरुवात केली, पण झिम्बाब्वेच्या निगरेव्हाने झिया ऊर रेहमानला 6 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर सिकंदर रझाने अफगाणला आणखी एक धक्का देताना कर्णधार शाहिदीचा त्रिफळा उडविला. त्याने 3 चौकारांसह 13 धावा केल्या. निगरेव्हाने अफसर झेझाईला 5 धावांवर झेलबाद केले. अफगाणची यावेळी स्थिती 5 बाद 69 अशी केविलवानी झाली होती. दरम्यान रेहमातशहा आणि शाहीदुल्ला यांनी संघाचा डाव सावरताना सहाव्या गड्यासाठी 67 धावांची भागिदारी केली. मुझारबनीने शाहीदुल्लाला झेलबाद केले. त्याने 53 चेंडूत 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. उपाहारावेळी अफगाणने दुसऱ्या डावात 44 षटकात 5 बाद 125 धावांपर्यंत मजल मारली होती.
रेहमत शहाचे शतक
रेहमत शहाने चिवट फलंदाजी करत अफगाणचा डाव बऱ्यापैकी सावरला. उपाहारानंतर रेहमत शहाने आपले शतक 209 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने झळकविले. रेहमत शहा आणि इस्मत आलम या जोडीने सातव्या गड्यासाठी अभेद्य 83 धावांची भागिदारी चहापानापर्यंत केली होती. रेहमत शहा 234 चेंडूत 12 चौकारांसह 116 तर इस्मत आलम 2 चौकारांसह 36 धावांवर खेळत होते. चहापानावेळी अफगाणने दुसऱ्या डावात 75 षटकात 6 बाद 219 धावा जमवित झिम्बाब्वेवर 133 धावांची आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वेतर्फे मुझारबनीने 46 धावांत 3 तर निगरेव्हाने 34 धावांत 2 तसेच सिकंदर रझाने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: अफगाण प. डाव सर्वबाद 157, झिम्बाब्वे प. डाव सर्व बाद 243, अफगाण दु. डाव चहापानापर्यंत 75 षटकात 6 बाद 219 (रेहमत शहा खेळत आहे 116, इस्मत आलम खेळत आहे 36, शाहीदुल्ला 22, शाहिदी 13, रियाज हसन 11, मुझारबनी 3-43, निगरेव्हा 2-34, सिकंदर रझा 1-53)