टीटीपी विरोधात कारवाईस अफगाण-तालिबानचा नकार
पाकिस्तानसोबतची चर्चा निष्फळ ठरण्याची चिन्हे
वृत्तसंस्था/ इस्तंबुल
तुर्कियेच्या इस्तंबूलमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत अडथळे निर्माण झाले आहेत. अफगाण-तालिबानच्या शिष्टमंडळाने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि अन्य संघटनांच्या विरोधात ‘विश्वसनीय पाऊल’ उचलण्याची हमी देण्यास टाळाटाळ केली. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान दहशतवादी संघटनांच्या विरोधातील कारवाईवरून सहमती होऊ शकलेली नाही. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने अफगाणिस्तानसमोर स्वत:ची अंतिम स्थिती मांडत तालिबानला अफगाणिस्तानातील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी ठोस आणि विश्वसनीय पावले उचलावी लागतील यावर जोर दिला.
तालिबानकडून दहशतवाद्यांना मिळणारे संरक्षण स्वीकारार्ह नाही. तालिबानची प्रतिक्रिया तर्कहीन आणि वस्तुस्थितीच्या उलट होती. तालिबानचे शिष्टमंडळ अन्य अजेंडा राबवू पाहत असल्याचे वाटतेय, असा दावा पाकिस्तानच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने केला आहे.
इस्तंबुलमधील चर्चेदरम्यान पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या लीपा सेक्टरमध्ये कथित स्वरुपात संघर्षविरामाचे उल्लंघन झाले आहे. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. तालिबानची ही भूमिका अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि क्षेत्राच्या हिताची नाही. चर्चेतील प्रगती अफगाण-तालिबानच्या ‘सकारात्मक भूमिके’वर निर्भर राहणार असल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.
लेखी आश्वासनास नकार
तालिबानच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानच्या मागण्यावर लेखी उत्तर दिले. ज्यानंतर पाकिस्तानने स्वत:ची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर तुर्किये आणि कतारच्या वरिष्ठ मध्यस्थांच्या उपस्थितीत दुसरी बैठक झाली. परंतु दीर्घ विचारविनिमयानंतर तालिबानच्या शिष्टमंडळाने कुठलेही लेखी आश्वासन देण्यास नकार दिला.
शिष्टमंडळात कोण सामील?
पाकिस्तानी शिष्टमंडळात आयएसआय, सैन्य अभियान संचालनालय, विदेश मंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा आणि गुप्तचर अधिकारी सामील होते. तर अफगाण तालिबानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व उपगृहमंत्री मौलवी रहमतुल्लाह नजीब यानी केले आणि यात तालिबानचे वरिष्ठ नेते अनास हक्कानी, सुहैल शाहीन, नूरुर रहमान नुसरत आणि अब्दुल कहार बाल्खी सामील होते.