अॅड. भुवनेश्वर फातर्पेकर यांना सूडाच्या भावनेतूनच अपघात
आमदार विरेश बोरकर यांचा गंभीर आरोप
पणजी : करमळी येथील मेगा प्रकल्पाविरोधात जे आंदोलन झाले, त्या आंदोलनात अॅड. भुवनेश्वर फातर्पेकर यांनी भूमिका बजावली आहे. चुकीच्या विरोधात जो बोलतो त्याच्यावर हल्ला होतो. असा प्रकार यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये घडलेला आहे. करमळी येथील आंदोलनाचा सूड घेण्यासाठीच फातर्पेकर यांना अज्ञात वाहनाची धडक दिली आहे, असा आरोप सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी केला आहे. बांबोळी इस्पितळात उपचार घेत असलेल्या फातर्पेकर यांची विचारपूस केल्यानंतर आमदार बोरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, फातर्पेकर हे करमळीच्या मेगा प्रकल्पा विरोधात आवाज उठवत होते आणि लोकांचा प्रश्न म्हणून त्यांनी हा विषय लावून धरला होता. परंतु फातर्पेकर जुने गोवा महामार्गावरील ‘अंडरपास‘जवळ चढावावरून सकाळच्या सुमारास दुचाकीवरून जाताना त्यांच्या स्कूटरला डाव्या बाजूने एका वाहनाने धडक दिली. मुळात हा हल्ला सूड भावनेतूनच झाल्याचा संशय आहे.