For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सफाई कर्मचाऱ्यांनाही कन्नड शिकण्याची सूचना?

12:35 PM Jul 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
सफाई कर्मचाऱ्यांनाही कन्नड शिकण्याची सूचना
Advertisement

महापालिकेकडून कन्नडसक्ती अधिक तीव्र : कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या हालचाली, कामकाजासह नामफलकांचेही कानडीकरण

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेकडून कन्नडसक्ती अधिक तीव्रपणे राबविली जात आहे. महापालिकेतील सर्व कामकाज व नामफलकांचे कानडीकरण करण्यात आल्यानंतर आता सफाई कर्मचाऱ्यांना देखील कन्नड वाचणे, बोलणे व लिहिण्याची सक्ती केली जात आहे. इतर भाषांसोबतच कन्नड भाषा येणे आवश्यक असल्याचे त्यांना महापालिकेकडून सांगितले जात आहे. लवकरच सफाई कर्मचाऱ्यांसाठी कन्नड कार्यशाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. यापूर्वी येथील सर्व शासकीय कामकाज मराठी भाषेतूनच चालत होते. सात बारा उतारे, त्याचबरोबर इतर सर्व शासकीय कागदपत्रे मराठीतूनच दिली जात होती. रेकॉर्ड रुममध्ये जुनी कागदपत्रे मागितली असता ती मराठी भाषेतीलच उपलब्ध होतात.

बेळगाववर असलेले मराठीचे वर्चस्व कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून सरकारकडून वेगवेगळे कार्यक्रम राबविले जात आहेत. सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने बेळगावात कन्नड भाषिकांचे वर्चस्व दाखविण्यासाठी मराठीची ओळख हळूहळू पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या आदेशानुसार मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेतील सरकारी परिपत्रके देणे गरजेचे आहे. मात्र कर्नाटक सरकारकडून त्याची पायमल्ली होत आहे. इतकेच नव्हे तर उच्च न्यायालयानेदेखील मराठी कागदपत्रे देण्याचा आदेश यापूर्वीच दिला आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधीच झाली नाही. यानंतर आता कन्नडसक्ती अधिक तीव्र केली जात आहे.

Advertisement

कन्नडसक्तीच्या विरोधात म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांनी लोकशाहीमार्गाने अनेक आंदोलने, चळवळी केल्या. त्याचबरोबर कायद्याचा दरवाजाही ठोठावला. पण उलट समिती व मराठी संघटनांच्या कार्यकर्त्यांवरच खोटेनाटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणले जाते. काही दिवसांपूर्वी शहरातील व्यापारी आस्थापनाच्या बाहेर असलेल्या फलकांवर 60 टक्के कन्नड तर उर्वरित 40 टक्के जागेत इतर भाषेतील अक्षरे लिहिण्यात यावीत, असा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर बळजबरीने आस्थापनाबाहेरील फलकांची चिरफाड करण्यात आली. त्यातच आता सरकारच्या सचिव शालिनी रजनीश यांनी पुन्हा शासकीय कार्यालयात कन्नड भाषेचा वापर प्रभावीपणे करण्यात यावा, असा आदेश जारी केला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी कन्नडसक्तीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

इतकेच नव्हे तर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कन्नड, इंग्रजी आणि मराठी भाषेत असलेला महापालिकेचा नामफलक देखील गायब झाला आहे. त्यामुळे महापालिकेला मराठी अधिकच खुपसत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकाराविरोधात म. ए. समिती आक्रमक बनली आहे. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे व म. ए. समितीचे नगरसेवक महापालिकेवर भगवा ध्वज फडकविण्याच्या तयारीत आहेत. पूर्वीप्रमाणे तिन्ही भाषेतील फलक न लावल्यास हा विषय अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण बैठकीदेखील गाजण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त केवळ कार्यालयातील कन्नडसक्तीपुरता मर्यादित राहिलेल्या नाहीत. पडद्याआडून त्यांनी सफाई कामगारांनादेखील कन्नड भाषा शिकण्याची सक्ती केल्याची माहिती मिळाली आहे. ज्या सफाई कर्मचाऱ्यांना कन्नड येत नाही. तशा सफाई कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळादेखील आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

Advertisement
Tags :

.