नोकरभरतीची जाहिरात गोव्यातच द्या
खासगी कंपन्यांना गोवा सरकारचा दणका : मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, निर्णयाचा गोमंतकीय युवकांना होणार लाभ
पणजी : राज्यातील खासगी कंपन्यांमध्ये नोकरभरती करताना त्यासंबंधीची जाहिरात गोव्यातील वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे बंधनकारक करतानाच सदर नोकरभरती जाहिरातीची माहिती रोजगार विनिमय केंद्राला देणे सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या खासगी कंपन्या नोकरभरतीची जाहिरात देणार नाहीत किंवा रोजगार विनिमय केंद्राला माहिती देणार नाहीत, त्यांना 5 ते 30 हजार ऊपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार राहणार असून, हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. गोवा राज्यातील युवकांना खासगी सेवेत प्रथम नोकरी मिळावी, यासाठी अशी पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. काल गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत यांनी विविध निर्णयांची माहिती दिली.
गोव्यातील खासगी कंपन्यांमध्ये नोकरभरती करताना स्थानिक वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे राज्यातील युवकांना नोकऱ्यांसाठी मुकावे लागत आहे. म्हणून खाजगी कंपन्या जर गोव्यात नोकरभरती करणार असतील तर त्याची जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रात द्यावी लागणार आहे. तसेच त्यांना रोजगार विनिमय केंद्राला भरतीची माहिती देणेही आवश्यक करण्यात आले आहे. खासगी कंपन्यात जास्तीत जास्त नोकऱ्या स्थानिकांना मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रोजगार खात्यातर्फे लवकरच एक प्रणाली विकसित केली जाणार आहे. याशिवाय रोजगार निरीक्षकांना देखील वेळोवेळी खाजगी कंपन्यांच्या भरतीवर लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
पणजीतील ऊआ दे ओरे येथील कन्व्हेन्शन सेंटर तसेच पंचतारांकित हॉटेलच्या कंत्राटाबाबत वित्त खात्याने काही सूचना केल्या होत्या. यानुसार दरवर्षी अतिरिक्त 5 टक्के रक्कम वाढवण्याच्या सूचनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. गोवा पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या युवा पर्यटन क्लब या कार्यक्रमाच्या तसेच बिमा सखी कार्यक्रमाच्या खर्चनादेखील एक्स फॅक्टो पद्धतीने मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन खात्यात 24 पदे भरणार
पशुसंवर्धन खात्यात सहाय्यक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या 24 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यातील पशुसंवर्धन खात्यासाठी आवश्यक असणारे पशुखाद्य महाराष्ट्रातील सहकारी संस्थेकडून आणण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
‘एक्स्पोझिशन’च्या खर्चाला मंजूरी
एक्स्पोझिशनसाठी आलेला 5 कोटी खर्च पोस्ट फक्टो पद्धतीने मंजूर करण्यात आला. तसेच कोविड काळात उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेल्या 15.23 लाख ऊपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.
गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हलला निधी
तपोभूमी येथील सद्गुरु फाउंडेशनला गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल आयोजित करण्यासाठी दीड कोटी ऊपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कला आणि संस्कृती खात्यातर्फे होईल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
म्हापसा अर्बनची ‘नंदादीप’ होणार सरकारची
म्हापसा अर्बन बँकेची नंदादीप ही इमारत 25 कोटी ऊपयांना सरकार विकत घेणार आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेण्यात आली आहे. त्यामुळे म्हापसा अर्बनची नंदादीप ही इमारत आता सरकारच्या मालकीची होणार आहे. या नंदादीप इमारतीत सरकार नव्याने भव्य संकुलाची उभारणी करेल आणि यातून आलेले पैसे म्हापसा अर्बनमधील ठेवीदारांना परत करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.