भारतीय महिलांची आगेकूच
वृत्तसंस्था/ बुसान
भारतीय महिला टेबल टेनिस संघाने पिछाडी भरून काढत शेवटच्या गटसाखळी लढतीत स्पेनवर 3-2 अशी मात करून विश्व टेटे सांघिक स्पर्धेच्या बाद फेरीच्या टप्प्यात स्थान मिळविले.
स्पेनच्या तुलनेत भारतीय संघ बलवान आहे. मात्र स्पेनने त्यांना कडवा प्रतिकार करीत विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. श्रीजा अकुला व मनिका बात्रा यांना पहिल्या दोन एकेरीत पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या एकेरीत ऐहिका मुखर्जीने विजय मिळवित भारताचे आव्हान जिवंत ठेवले. चौथ्या व पाचव्या सामन्यात मनिका बात्रा व श्रीजा अकुला यांनी विजय मिळवित भारताचे बाद फेरीतील स्थानही निश्चित केले. गट एक मध्ये चीनने पहिले तर भारताने दुसरे स्थान मिळविले. भारताने चार लढतीत तीन विजय मिळविले. चीनविरुद्ध भारताला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.
या स्पर्धेत 40 महिला संघांनी भाग घेतला असून बाद फेरीसाठी पात्र ठरलेल्या 24 संघांत भारताचाही समावेश आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश मिळविले तर पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित होईल. भारतीय महिलांना आता पुढच्या दोन लढतीत जिंकून उपांत्यपूर्व फेरीसाठी गाठावी लागणार आहे, तसे झाल्यास भारताला ऑलिम्पिकची पात्रताही मिळेल.
येथील लढतीत श्रीजाला पहिल्या सामन्यात मारिया झिआवकडून 9-11, 11-9, 11-13, 4-11 असा पराभव पत्करावा लागला तर सोफिया झुआन झँगने मनिका बात्रावर 13-11, 6-11, 8-11, 11-9, 11-7 अशी मात करून स्पेनला 2-0 अशी बढत मिळवून दिली. ऐहिकाने एल्विरा रॅडचा 11-8, 11-13, 11-8, 9-11, 11-4 असा पराभव केल्यानंतर मनिका बात्राने मारियावर 11-9, 11-2, 11-4 असा धुव्वा उडवत भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. शेवटच्या सामन्यात श्रीजाने सोफिया झुआनला 11-6, 11-13, 11-6, 11-3 असे हरवून भारताला 3-2 असा विजय मिळवून दिला.